BMC Election 2026: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका  आणि देशाच्या आर्थिक नाड्या हातात असणाऱ्या मुंबईसारख्या शहराचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला सुरुवात होईल. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान पार पडेल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) निकाल जाहीर होईल. यंदाच्या निवडणुकीत मुंबईत (Mumbai news) अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचाही समावेश आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) हा मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मतदानापूर्वीच नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन याबाबत भाष्य केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, नील सोमय्या प्रभाग क्रमांक 107 मधून लढत आहे. या वॉर्डमध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापैकी कोणीही उमेदवार रिंगणात उरलेला नाही. मुलुंडमधील अन्य पाच प्रभागांमध्ये या सगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. देवाची लिला अपरंपार आहे, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नील सोमय्या हे 2017 साली पहिल्यांदा मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडून आले होते. ते दुसऱ्यांदा महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात गुजराती, मारवाडी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मुलुंडचा बहुतांश परिसर भाजपला साथ देताना दिसतो. त्यामुळे साहजिकच मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधील लढतीत नील सोमय्या यांचे पारडे जड मानले जात आहे. मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाची युती आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 107 मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हंसराज दनानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्राच न जोडल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला आहे. या वॉर्डातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता नील सोमय्या यांच्यासमोर फारसे आव्हान उरलेले नाही. परिणामी या वॉर्डातून नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, याठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह 9 अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू अपक्षांपैकी एकाला पाठिंबा जाही करु शकतात का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

आणखी वाचा

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा झटका, पाच उमेदवारांचे अर्ज बाद, 'या' महापालिकेत धक्का