BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर यंदा मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजपची (BJP) एकहाती सत्ता आणून आपलाच महापौर बसवायचा, असा चंग भाजपने बांधला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील (Mumbai Election 2026) मराठी मतदार मोठ्याप्रमाणावर त्यांच्या बाजूने वळण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील लोकसंख्या वाढल्याने मराठी मतदारांची संख्या पूर्वीइतकी राहिलेली नाही. तरीही मराठी मतदार (Marathi Voters) मोठ्याप्रमाणावर ठाकरे बंधूंकडे वळल्यास मुंबईतील अमराठी व्होटबँक आपल्या बाजूने भक्कमपणे उभी राहावी, यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. 

त्यानुसार मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज ग्राऊंड लेव्हलला जाऊन भाजपचा प्रचार करेल. प्रत्येक बुथ स्तरावर संघाची ताकद ही भाजपच्या दिमतीला असेल. याशिवाय, मुंबईत ब्रँड ठाकरेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सहा सभा घेणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुंबईत तळ ठोकून राहण्याची शक्यता आहे. मात्र, या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने त्यांचा भक्कम जनाधार असलेल्या मुंबईतील अमराठी व्होटबँकेला एकत्र करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. अमराठी मतदारांमध्ये हिंदुत्त्वाचे कार्ड हमखास चालणारे आहे. त्यासाठी नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत उतरवले जाणार आहे. याशिवाय, उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मुंबईत 5 खास लोकांना बोलवण्यात येणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, रवी किशन, निरुहा यांचा समावेश आहे. हे पाच उत्तर भारतीय चेहरे मुंबईतील अमराठी व्होटबँक असलेल्या भागांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. 

तर दुसरीकडे मुंबईत भाजपसोबत युतीत लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मायक्रो-प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शाखाप्रमुखांना प्रत्येक घरात जाऊन प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून लक्ष्यवेध या अॅपचा वापर केला जात आहे. याशिवाय, शिंदे गटाकडून मतदानाला येऊ न शकणाऱ्या वृद्ध मतदारांवरही नजर ठेवली जात आहे. या वृद्धांची पोस्टल मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे सेनेकडून ग्राऊंड लेव्हलला विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे जोडीने शाखांमध्ये जाणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने रंगत चढणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे आजपासून मुंबईतील विविध शाखांना भेटी देणार आहेत. आज ते शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या लालबाग परिसरातील प्रभाग क्रमांक 204 मधून शाखेला भेट देऊन प्रचाराची सुरुवात करतील. यानंतर ते वरळीतील शाखेला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुंबईतील एकूण 12 शाखांना भेट देणार आहेत. तर राज आणि उद्धव ठाकरे चार-पाच शाखांमध्ये एकत्र फिरतील. याशिवाय, आज विक्रोळीत राज आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

आणखी वाचा

मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी