BMC standing Committee: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर निश्चित झाल्यानंतर पालिकेच्या कारभारात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या समित्यांचे वाटप झाले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप (BJP) आणि शिंदे सेनेची सत्ता आली आहे. त्यांच्यातील सत्तावाटपाचा फॉर्म्युला आता समोर आला आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेतील चार महत्त्वाच्या समित्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. सर्वाधिक महत्त्वाची स्थायी समिती (Standing Committee) भाजपकडे राहणार आहे. स्थायीसह शिक्षण समिती देखील भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सुधार समितीसह आणि बेस्ट समिती (Best Samiti) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यावर एकमत झाल्याचे समजते. 20 फेब्रुवारीपर्यंत महत्त्वाच्या समित्यांचे वाटप केले जाणार आहे. तर प्रभाग समित्यांसह इतर समित्यांच्या वाटपाची प्रक्रिया पुढील दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती ही पालिकेच्या तिजोरीची चावी समजली जाते. महानगरपालिकेच्या विकासकामांसाठी निधी वाटपाचे सर्व निर्णय स्थायी समितीकडून घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीचा अध्यक्ष असणे हे महापौरपदाच्या तोडीस तोड मानले जाते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्थायी समितीत योग्य वाटा मागला होता. मात्र, भाजपने ही समिती आपल्याकडे ठेवून एकप्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची सूत्रे स्वत:च्या हातात ठेवली आहेत.
गेल्याच आठवड्यात भाजपने मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांचे नाव जाहीर केले होते. तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली होती. शिवसेनेने उपमहापौर फक्त सव्वा वर्षासाठी नेमला आहे. त्यानंतर उपमहापौर म्हणून शिंदे सेनेतील दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळू शकते. सुरुवातीला ठाकरे गट महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने रितू तावडे यांचे नाव जाहीर केल्यानंतर मराठी महापौराला आम्ही विरोध करणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. त्यामुळे रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजपने घाटकोपरमधील गुजरातीबहूल भागातून निवडून आलेल्या रितू तावडे यांना महापौर करुन मराठी आणि अमराठी या वादात समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लावून धरली होती.
Mumbai News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1
आणखी बातम्या
