BJP Vs Shivsena BMC Election 2026: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडली. शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप (BJP) आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. याठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर (Shilpa Keluskar) आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे (Pooja Kamble) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे. आज सकाळी या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरु असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरुन '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. आतापर्यंत ठाकरे गट '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होता. मात्र, आपल्या मित्रपक्षानेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे सेनेचे (Shivsean Shinde Camp) कार्यकर्ते संतापले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत भाजप आणि शिंदे गटात झालेल्या या भांडणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Mumbai Election 2026)
शिवसेना-भाजपच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 हा शिंदे सेनेला सुटला होता. त्यामुळे शिंदे सेनेने येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, पूजा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैधही ठरला होता. त्यामुळे शिंदे गटाने वॉर्ड क्रमांक 173 मध्ये नाईलाजाने मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला होता. मात्र, आता प्रचार सुरु झाल्यानंतर या वॉर्डमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढणार, हे बघावे लागेल.
दरम्यान, या सगळ्या प्रकाराविषयी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपचे कोण महारथी आहे त्यांना पाहावे लागेल. या घोषणा देण्यापूर्वी फडणवीस यांना विचारा, आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा, याबद्दल फडणवीस दखल घेतील, अशी अपेक्षा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या घोषणेबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Mumbai news: दत्ता केळुस्करांचं स्पष्टीकरण
आमच्या तोंडातून थोडासा चुकीचे शब्द निघाले. त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यानुसार 50 खोके नाही तर 'अकरा खोके एकदम ओके', अशी घोषणा द्यायला हवी. त्याची जंगम प्रॉपर्टी 11 कोटी आली कुठून?? त्यामुळे आम्ही नवी घोषणा सुरू केली आहे. ही घोषणा फक्त आमचे मित्र रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे, त्यांच्या पक्षासाठी ही घोषणा नाही. ही लढाई होणारच आहे. कारण माझी तिकीट त्याने चोरली आणि लोकांना दाखवलं की त्याची तिकीट मी चोरली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून त्याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट घेतलं, असे दत्ता केळुस्कर यांनी म्हटले.
कलर झेरॉक्स असू दे किंवा आम्ही चोरून फॉर्म लावलेला असू दे, हा प्रश्न व्हॅलिड नाही. कारण निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यांनी त्यांचं काम योग्य प्रकारे केले. भाजपचे अधिकृत उमेदवार आहे कमळाचे चिन्ह आहे. 16 तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील , असे भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुस्कर यांनी म्हटले.
आणखी वाचा