Nitin Nabin Net Worth: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन (Nitin Nabin) यांची बिनविरोध निवड झाली आहे. 20 जानेवारीला नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज उपस्थित होते. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सध्या नितीन नवीन कोण आहेत?, नितीन नवीन यांची संपत्ती किती?, याबाबत चर्चा सुरु आहे.
नितीन नवीन यांची संपत्ती किती? (Nitin Nabin Net Worth)
नितीन नवीन हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, नितीन नवीन यांची एकूण मालमत्ता अंदाजे 3.08 कोटी इतकी आहे. यामध्ये 1.60 कोटींची स्थावर मालमत्ता, तर 1.47 कोटींची जंगम मालमत्ता समाविष्ट आहे. शिवाय, नितीन नवीन यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 56.6 लाखांची देणी देखील जाहीर केली आहेत. त्यांच्या मालमत्तेच्या घोषणेमध्ये बँक ठेवी, गुंतवणूक, वाहने आणि सोन्याचे दागिने समाविष्ट आहेत. नितीन नवीन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 35,000 रुपये रोख आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे 25,000 रुपये रोख आहेत, अशी माहिती दिली. तसेच नितीन नवीन यांच्याकडे स्वत:चं घर नसल्याची माहितीही समोर आली आहे.
नितीन नवीन यांच्याकडे किती गाड्या? (BJP Nitin Nabin)
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनूसार, नितीन नवीन यांच्या नावावर एक स्कॉर्पिओ आणि एक इनोवा क्रिस्टा कार नोंदणीकृत आहे. पती-पत्नी आणि मुलांकडे सुमारे 11 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले होते.
नितीन नवीन यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
नितीन नवीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत, ज्यातून त्यांना त्यांचे वेतन आणि भत्ते मिळतात. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की त्यांनी चालू आर्थिक वर्षात 3.71 लाख रुपये कमावले, तर त्यांच्या पत्नी डॉ. दीपमाला श्रीवास्तव यांनी सुमारे 1.2 लाख रुपये कमावले. परिणामी, दोघांचे एकत्रित उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये आहे. शेती, व्यवसाय किंवा व्यावसायिक उपक्रमांमधून त्यांच्या नावावर कोणतेही उत्पन्न नाही.
कोण आहे नितीन नवीन? (Who Is Nitin Nabin)
- 23 मे 1980 रोजी नितीन नवीन यांचा जन्म
- झारखंडची राजधानी रांचीचे रहिवासी
- वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हेही होते भाजप आमदार
- 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रीय
- 2006 मध्ये पोटनिवडणुकीद्वारे प्रथमच बिहार विधानसभेवर
- 2010,2015,2020,2025 अशा चार वेळा बांकीपूरचे आमदार
- रस्ते वाहतूक,नगरविकास,गृहनिर्माण, विधी व न्याय खात्याचे मंत्री राहिले
- भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी, छत्तीसगडचे सहप्रभारी होते
- डिसेंबर 2025 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड
- 20 जानेवारी 2026 पासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार
