Nishikant Dubey: मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) दुबे यांना येत्या 7 एप्रिल रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Nishikant Dubey: नेमकं प्रकरण काय?
काही काळापूर्वी खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी बोलताना प्रक्षोभक विधान केले होते. "मराठी माणसाला पटक-पटक के मारेंगे", असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दिले होते जशास तसे उत्तर
दुबे यांच्या या विखारी विधानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत चोख प्रत्युत्तर दिले होते. "निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आले, तर त्यांना इथे 'डुबा-डुबा के मारेंगे'," असा प्रति-इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. या वादानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
MNS Leader Sudam Kombade Files Petition: मनसेचा आक्रमक पवित्रा
केवळ शाब्दिक युद्ध न थांबवता मनसेच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा न्यायालयीन स्तरावर करण्यात आला. मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची पुढची सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे. 7 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीला निशिकांत दुबे यांनी स्वतः हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या सुनावणीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निशिकांत दुबे नाशिक न्यायालयात हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sudam Kombade: तू नक्की नाशिकला ये, सुदाम कोंबडेंचा इशारा
दरम्यान, मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी याचिका दाखल करताना निशिकांत दुबे यांना इशारा दिला होता. निशिकांत दुबे सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना सांगितले की, अशी बेताल वक्तव्ये करू नये. परंतु, हा माणूस थांबायला तयार नाही. म्हणूनच यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आता आम्ही दुबेला दाखवू की, कसे पटक पटक के मारते हैं. तू नाशिकला ये. त्यांना समजतच नाही की, संपूर्ण देशाची महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. हा माणूस खासदार असला तरी त्यांना अभ्यास कमी आहे. म्हणून दुबे, तुला धडा शिकवावा लागेल. तू नक्की नाशिकला ये, असा इशारा त्यांनी दिला होता.
आणखी वाचा
