मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अजित दादा आपल्यातून गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला अद्यापही न पटणारे दु:ख आहे. मात्र, वास्तव स्वीकारुन महाराष्ट्र शोकसागरातून बाहेर येत आहे. एकीकडे कार्यकर्त्यांच्या मनातील दु:ख कमी होत नसताना दुसरीकडे सत्ता आणि पक्ष यांच्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अजित पवारांच्या जागी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत थेट प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचं सांगितलं. मात्र, आता आपल्या वक्तव्यावरुन त्यांनी यु-टर्न घेतला आहे.

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत, अशी चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकाराने मला दिली होती. मात्र, मी कुठलीही अधिकृत माहिती घेतल्याशिवाय एका मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केलं. पण, माझी माहिती चुकीची असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असे असे म्हणत केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले. तसेच, या चुकीच्या माहितीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असेही गोयल यांनी म्हटलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काल (शनिवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत पटेल यांच्या निवडीवरुन थेट टीका करत भूमिका मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या, रांगड्या मातीतील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा कोणीही पाटील असावा पण पटेल नसावा, असे परखडपणे मांडले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियातून राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलं. 

प्रफुल्ल पटेल यांनीही वृत्त फेटाळले

दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानंतर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनीही आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडीयावर पोस्ट करत आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीचे वृत्त त्यांनी फेटाळले. तर, अजित पवारांच्या पश्चात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे बोट दाखवले होते.

हेही वाचा

Video: पियुष गोयल पीटीआय मुलाखतीत थेट म्हणाले, पफुल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड, आता पटेल म्हणतात, 'तसं काही झालेलं नाही' कालच राज ठाकरेंचा कडाडून विरोध!