मुंबई : राज्यमंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत चंद्रपूरमधील (Chandrapur) भाजप-ठाकरेंच्या शिवसेना पाठिंब्यावर भाष्य केलं. तसेच, पुरंदर विमानतळाला मान्यता दिली असून पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाईल, 1 जूनपर्यंत अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर, तिसऱ्या मुंबई संकल्पनेला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील महापौरपदाच्या निवडीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मला या संदर्भात फार माहीत नाही. चंद्रपूरमध्ये झालेल्या युतीची मी माहिती घेईन, पण चंद्रपूरच्या महापौरांना माझ्या शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
चंद्रपूरमध्ये भाजपला महापौरपद मिळेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती मिळणार आहे. काँग्रेसनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती देऊ केली होती. मात्र, पाच वर्षात महापौरपद मिळणार नसल्यानं भाजपसोबत जाणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी म्हटलं. त्यामुळे, राज्यात एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप-ठाकरेंची युती चंद्रपुरात पाहायला मिळाली. त्यावर, फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत महापौरांना शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत मंगळवारी ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे विमानतळ होणार आहे. त्यासाठी जमीन अधीग्रहण स्वीकारण्यास 96 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे. अटल सेतू या ठिकाणी काही जमीन एमएमआरडीएला देण्यात आली आहे. ही जमीन अधिग्रहण होईल, त्यामुळे तिसरी मुंबई तयार करता येईल. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून नवीन कर्ज घेणार आहे, यालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, आठ लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
सुनेत्रा पवारांचं औपचारिकपणे स्वागत
अजित पवार यांच्या निधनानंतर शोकप्रस्ताव सादर केला, औपचारीकपणे सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स केला आहे, पुढे ही होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे म्हणत विलिनीकरणावर बोलणे त्यांनी टाळलं.
कोणाला मळमळ वाटते
राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर टीका केली, त्यावरुन फडणवीसांनी पलटवार केला. ज्या लोकांना निमंत्रण मिळाल नाही ते टीका करतात. शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून लोकांना माहिती मिळावी, या हेतुने हा कार्यक्रम होता. ज्या लोकांचा संघाशी संबंध नाही, अशा लोकांनाही बोलवण्यात आलं होतं. यात कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ वाटते. ज्यांना बोलवलं नाही त्यांना हे वाटतं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.