Beed News: बीड जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वतः पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. परंतु आष्टी मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या निवडी मात्र अद्याप झालेल्या नाहीत. गत काही दिवसात भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय. या संघर्षामुळेच या निवडी देखील लांबल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजवर बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये (Maharashtra BJP) पंकजा मुंडे यांचा शब्द अंतिम असायचा. परंतु प्रथमच आमदार सुरेश धस यांनी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील रखडल्या आहेत. आता या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये मुंडे आणि धस यांच्यात कोण बाजी मारतो. यावरूनच पक्ष नेमका कोणाच्या पाठीशी आहे? हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे.
बीड जिल्ह्यात भाजपाचे 24 मंडळ अध्यक्ष जाहीर झाले. त्यापैकी 20 मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर झाली. मात्र आष्टी मतदारसंघात तांत्रिक अडचणीमुळे या निवडी झाल्या नसल्याचं जिल्हाध्यक्षांनी म्हटलं. तर पंकजा मुंडे आणि भाजपचे वरिष्ठ नेते या निवडी लवकरच जाहीर करतील असे म्हणत मुंडे धस वादावर अधिकचे बोलणे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी टाळले आहे.
भाजपच्या संघटन बांधणीला नवे बळ, 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या (BJP) संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर 1221 मंडळ गठीत करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील 258 मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.
इतर महत्वाच्या बातम्या
