Jaykumar Gore: महाभारतात (Mahabharat) कौरवांनी श्रीकृष्णाची संपूर्ण सेना घेतली, मात्र पांडवांनी एकट्या कृष्णाला निवडले. याच श्रीकृष्णाने युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने निवडक रणनीती आखत कौरवांच्या दिग्गज योद्ध्यांना निष्प्रभ केले. आज काळ बदलला असला तरी याच पद्धतीने भाजप (BJP) निवडक योद्ध्यांना सोबत घेत विजयाचा मार्ग आखते, असे सांगत भाजपच्या विजयाचे रहस्य मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी उलगडून दाखवले.
वाडीकुरोली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील समाधान काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने जयकुमार गोरे यांनी एकप्रकारे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
Jaykumar Gore: "कोणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाही"
यावेळी भाषण करताना जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “त्याला वाटतं समोरचे सगळेच पागल आहेत. आपण सगळ्यांना फसवू शकतो आणि समोरच्याला ते कळणारच नाही. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर भाजपने छत्र काढले, तर आपले काय होईल?” असा थेट सवाल गोरे यांनी केला. “कोणाचाही नाद करा, पण देवाभाऊंचा नाद करू नका,” असा स्पष्ट इशाराही जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणातून दिला.
Jaykumar Gore: “भाजपला संपवणारा अजून जन्मालाच यायचा आहे”
काही नेत्यांना मिळालेलं यश पचवता येत नाही, असा टोला लगावत जयकुमार गोरे म्हणाले, “आम्ही चार टर्मचे आमदार आहोत. मात्र काही लोक आपली कुवत विसरून भाजपला संपवण्याची भाषा करत आहेत. आधी आपली ताकद ओळखा. काही नेते म्हणतात भाजपला संपवायचं आहे, पण भाजपला संपवणारा अजून जन्मालाच यायचा आहे,” असा घणाघाती टोला देखील त्यांनी लगावला.
Jaykumar Gore: प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या प्रवेश सोहळ्यावेळी भाजप आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे नेते कल्याणराव काळे, शरद पवार गटाचे नेते युवराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
