Sharad Pawar and BJP: राज्यातील 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन लोक आपल्याला भेटायला आले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते प्रतिवाद करण्यासाठी तातडीने मैदानात उतरले आहेत. भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2025)
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शरद पवार हे विधान करतात. दोन माणसं भेटती आणि १६० विधानसभा मतदारसंघ मॅनेज करुन देतो असं सांगितलं होतं, तर त्यांनी तेव्हा याबाबत का नाही सांगितलं? मुळात हाच एक अपराध आहे. माहिती असताना उघड का केली नाही. आता म्हणतात कोण माणसं होती माहिती नाही. हे सर्व अपराधीपणा आणि खोटेपणाचे आहे. राहुल गांधींची पत्रकार परिषदच मुळात चुकीच्या आधारावर होती.
शरद पवार या खोटेपणाला का जोर देतायत माहिती नाही. त्यांना माहिती होती तर ती आधीच बाहेर आणायला हवी होती. ते तेव्हा गप्प का बसले? आता का बोलतायत? शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अशी विधानं करणं नक्कीच अपेक्षित नाही, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले.
Sharad Pawar on Election scam: शरद पवार नेमकं काय म्हणाले?
मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ. नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारु असे आम्ही ठरवल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा