पुणे: मागील 12 वर्षांपासून लोकसभा आणि राज्यसभेत (Loksabha And Rajyasabha) एकहाती वर्चस्व असलेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) शुक्रवारी मोठा धक्का बसला. महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारला संसदेत मंजूर करुन घेता आले नाही. हे विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. मात्र, विधेयकायच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे घटनादुरुस्तीसह महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर काल (शनिवारी, ता १८) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भाष्य केलं, त्याचबरोबर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काल महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संंबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली. काँग्रेसने इतिहास रचण्याची आणि महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली असं नरेंद्र मोदी म्हणाले. मोंदींनी (PM Modi) मांडलेल्या भुमिकेवरती आणि भाषणावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत मोदींचं नाव न घेता टीका केली आहे.

Continues below advertisement

Rohit Pawar: रोहित पवारांनी काय म्हटलंय?

रोहित पवारांनी म्हटलंय की, "पराभवाचंही भांडवल करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजप इतकं माहीर जगात कुणीच नसेल…! सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करुन त्यावर आगामी तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का, यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो.. या तिन्ही ठिकाणी कमळ काही फुलणार नाहीच, पण एकमात्र खरंय की, आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार-चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तमिळनाडूमध्ये DMK, प. बंगालमध्ये TMC आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस युतीची सत्ता येणार असल्याचा तर २०२९ मध्ये देश INDIA आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला..", असंही पुढे रोहित पवार म्हणालेत.

Continues below advertisement

PM Modi: मोदींनी नेमकं काय म्हटलंय?

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे महिलांच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमध्ये मोठी वाढ होणार होती. परंतु काँग्रेसला ते नको असल्याने त्याला विरोध केला. काँग्रेसने 'फोडा आणि राज्य करा' हे सूत्र इंग्रजांपासून घेतलं आणि त्याचाच वापर त्यांनी यावेळी केला.  मतदारसंघ पुनर्रचनेवर काँग्रेस आणि टीएमसी, डीएमके, समाजवादी पक्षाने सातत्याने अफवा पसरवल्या. या विधेयकाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या संसदेतील प्रतिनिधित्वामध्ये समान वाढ होणार होती. परंतु, विरोधकांच्या विरोधामुळे हे होऊ शकलं नाही. डीएमकेला मोठी संधी होती. या विधेयकामुळे अधिक तामिळ लोक हे संसदेत आले असते. परंतु डीएमकेने त्याला विरोध केला. समाजवादी पक्षाने तर राम मनोहर लोहिया यांच्या विचारसरणीचा कधीच त्याग केला आहे. त्यामुळे या सर्वांनी मिळून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध केला.

काँग्रेस सातत्याने नकारात्मक राजकारण केलं. याच काँग्रेसने जनधन, आधार, डिजिटल पेमेंट यासह तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्याला विरोध केला. समान नागरी आचरसंहितेला काँग्रेसने त्याला विरोध केला. सुधारणांचं नाव ऐकताच काँग्रेस विरोधाच्या भूमिकेत जाते. देशाला बळकटी देण्याच्या प्रत्येक प्रयत्नात काँग्रेसने विरोध केला. त्यांनी 'एक देश एक निवडणूक'ला विरोध केला. त्याचसोबत सर्वच सुधारणांना काँग्रेसने खोटं बोलत विरोध केला.