Ganesh Naik Vs Eknath Shinde: माझ्याकडे आता गमावण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागलात तर तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार करेन. उन्माद कराल तर तो काढण्याची माझ्याकडे ताकद आहे, असे वक्तव्य भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. गणेश नाईकांनी ठाण्याच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यानंतर डिवचल्या गेलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांना निर्वाणीचा इशारा दिला.
मी आज ओपनली सांगतो, माझ्या नादाला जर लागलात ना... गणेश नाईकचं आता काही शिल्लक नाही राहिलेलं नाही. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊन झालाय. मी आज 75 वर्षांचा आहे, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट अँड फाईन आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम आहे. मी रोज शांत झोपतो. सीबीआय चौकशी करेल किंवा ईडीची धाड पडेल, याची मला काही चिंता नाही. माझं सगळं ओपन आहे. धास्ती त्यांनाच आहे. लिहून ठेवा, भविष्यकाळात यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवला आहे. त्यांनी आजचं मरण फक्त उद्यावर ढकलले आहे, असे गणेश नाईक यांनी म्हटले.
नवी मुंबईत यंदा पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे गणेश नाईक हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेची 3 हजार कोटींची एफडी 800 कोटींवर आली, हे कोणामुळे झाले? नगर विकास खाते कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत होते?, असा सवाल गणेश नाईक यांनी उपस्थित केला. 14 गावांचा समावेश करताना तीन वेळा पालकमंत्री राहिलेल्या गणेश नाईकला विश्वासात घेतले नाही. तुमच्या आधी पालकमंत्री गणेश नाईक होता, गणेश नाईकच्या मतदारसंघात ही 14 गावं येणार आहेत. यावरुन सगळ्यांना हलक्यात घेता असं वाटतंय, पण मला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही गणेश नाईक यांनी दिला.
आणखी वाचा
मला हलक्यात घेऊ नका, उन्माद कराल तर तो काढण्याची माझ्याकडे ताकद; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
