BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: भारतीय जनता पक्षाने (BJP) नागपूरसह विविध शहरांमध्ये लावलेल्या एका होर्डिंगमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. “मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला… धन्यवाद महाराष्ट्र!” असा मजकूर असलेले हे होर्डिंग राज्यातील विविध शहरांमध्ये झळकत असून, त्याद्वारे भाजपने महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहेत. मात्र, या आभार प्रदर्शनामागेच मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. मात्र आजच्याच दिवशी भाजपकडून ठाकरे बंधूंना डिवचणारे होर्डिंग लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: नागपूर शहरात झळकले होर्डिंग 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही हे होर्डिंग मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या या बॅनरकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो, तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचेही छायाचित्रे दिसून येत आहेत.

BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: आभार की राजकीय टोला?

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी मते यांवर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. विशेषतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मात्र, निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर, “मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला” असा संदेश देत भाजपने मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनाच मतदारांनी नाकारले, असा सूचक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: बॅनरमागचा नेमका राजकीय संदेश काय?

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळवले.  या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपने राज्यभर हे होर्डिंग लावले आहेत. मात्र, ‘हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला’ या ओळीतून भाजपने आपली राजकीय भूमिका पुन्हा अधोरेखित करत, विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केल्याचे बोलले जात आहे. या होर्डिंगची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून, भाजपच्या या आभार बॅनरमागचा नेमका राजकीय संदेश काय? यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आणखी वाचा 

Raj Thackeray On Balasaheb Thackeray: बरा आहेस ना रे..., कुठे लागलं नाही ना?; माझे काका म्हणत राज ठाकरेंचा 'दै. सामना'मध्ये बाळासाहेबांवर विशेष लेख, काय काय म्हणाले?