ठाणे : बदलापूरमधील (Badlapur) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे (BJP) स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. विशेष म्हणजे, कालच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या, तर भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे (MNS) बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध लक्षात घेत तुषार आपटेंनी आपला राजीनामा दिला आहे.  

Continues below advertisement

तुषार आपटेंच्या नगरसेवक निवडीनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपने बक्षीस दिलाय का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. त्यामुळेच, ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपने आपटेंची निवड केल्याने नाचक्की झाली. कारण, बदलापूर बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तुषार आपटे सह आरोपी आहे, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र, आरोपी असताना त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त करत पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर, पक्षाची बदनामी होत असल्याने तुषार आपटे यांनी स्वतःच राजीनामा दिला आहे. महोदय, मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, माझी कुळगाव बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य / नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे, माझा राजीनामा स्वीकारावा ही विनंती, असा आशय तुषार आपटेनी राजीनामापत्रात दिला आहे. 

बावनकुळेंनी दिला होता कारवाईचा इशारा

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्याच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्र्यांनी दिली. त्यानंतर, काही वेळातच तुषार आपटेचा राजीनामा घेण्यात आला आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

BJP Tushar Apte: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद, भाजपची पहिली प्रतिक्रिया