Bhavana Gawali: फडणवीसांच्या घरात जाताना उत्साहात, पण भेटीनंतर भावना गवळींचा नूरच बदलला, यवतमाळमधून पत्ता कट?
Nagpur News: देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये पोहोचले तेव्हा शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी त्यांना भेटायला घरी गेल्या होत्या. फडणवीसांच्या घरात जाण्यापूर्वी भावना गवळी उत्साहात दिसत होत्या. मात्र, या भेटीनंतर भावना गवळींनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.
नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या जागावाटपात अद्याप उमेदवारी जाहीर न झालेले शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थ नेत्यांपैकी एक असणाऱ्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याबाबत सोमवारी नागपूरमध्ये घडलेला प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भावना गवळी या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या (Yavatmal–Washim Lok Sabha) विद्यमान खासदार आहेत. त्या सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. मात्र, अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे भावना गवळी यांची धाकधूक सध्या वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील आपल्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरी गेल्या होत्या. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्यामुळे त्यांच्यासारख्या कलंकित नेत्याला उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत अद्याप महायुतीकडून निर्णय झालेला नाही. भावना गवळी यांच्याऐवजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिंदे गटाच्या संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
फडणवीसांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर भावना गवळींचा नूरच बदलला
भावना गवळी या आपल्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाण्यापूर्वी भावना गवळी यांची गाडी बाहेर थांबली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. तेव्हा भावना गवळी यांनी मी बाहेर आल्यानंतर बोलते, असे सगळ्यांना सांगितले. त्यानंतर भावना गवळी जवळपास 25 मिनिटं देवेंद्र फडणवीस यांच्या घरात होत्या. तिथून बाहेर पडल्यानंतर भावना गवळी या सांगितल्याप्रमाणे मीडियासमोर आल्या नाहीत. त्यांनी फडणवीसांच्या घराच्या अंगणात आपली गाडी बोलावून घेतली व भावना गवळी तिथूनच गाडीत बसून निघून गेल्या. त्यामुळे फडणवीसांच्या घरातील 25 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
आणखी वाचा
मविआ, वंचितचे ठरलं! यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघातील महायुतीचा उमेदवार मात्र ठरता ठरेना