चिपळूण: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन शिबिर घेतलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांच्या उपस्थितीवरून भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा रखवालदार हा त्या गावाचा शाखाप्रमुख असतो. गावचा शाखाप्रमुख जागरूक असताना गावात काहीही चुकीचे होऊ शकत नाही, गावाचा रखवालदार जागरूक नाही तर पक्षाचे रक्षण कोण करेल? असं म्हणत भास्कर जाधव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, गावागावात शाखाप्रमुख सतर्क आहे, जागरूक आहे, तो अभ्यासू आहे, निर्भय आहे आणि तो निर्भीड आहे. त्या गावांमध्ये सहजासहजी कोणाला शिरकाव करता येत नाही. म्हणूनच पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाची उजळणी केली. एक महत्त्वाची बैठक बोलावली आणि मी सांगितलं की फक्त शाखाप्रमुखांनी या. जसं की आज सांगितलं आहे, फक्त शाखाप्रमुखांनी या असं मी म्हटलं होतं, आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघांमधील आलेले शाखाप्रमुख आणि त्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर मला अतिशय काळजी वाटली, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. माझ्याकडे पूर्व विदर्भ आहे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, रामटेक त्या भागामध्ये मी बैठका घेतल्या, जशी मी आज तुमची हजेरी घेतली, तशीच हजेरी मी सर्वांची घेत असतो, त्याच्यामध्ये शाखाप्रमुख किती आले होते, तेव्हा निदर्शनास आल्यावर शाखाप्रमुख उपस्थितच राहत नाहीत, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, विभाग प्रमुख हजर राहतात, उपविभाग प्रमुख हजर राहतात, तालुका प्रमुख हजर राहतात, उपजिल्हाप्रमुख उपस्थित राहतात, संघटक, समन्वयक, सर्वजण हजर राहतात. मात्र, शाखाप्रमुख हजर राहत नाहीत. त्या गावाचा रखवालदारच आमचा जागेवर नाही. त्या गावाचा आमचा रखवालदार जागरूक नाही. तर त्या मतदारसंघात माझ्या माझ्या पक्षाचे रक्षण कोण करेल? माझ्या पक्षाच्या सीमा तोडून आतमध्ये जो कोणी घुसायचा प्रयत्न करतो, त्याला कोण रोखेल? त्याला शाखा प्रमुखाच्या व्यतिरिक्त कोणी रोखू शकत नाही. विभाग प्रमुख चार गावाचा, दहा गावाचा असेल, तो पंधरा गावाचा असेल, पण त्या त्या गावातील शाखाप्रमुख हा त्या गावांमध्ये सतर्क आणि जागरूक असला पाहिजे, तो महिला शाखाप्रमुख असेल, तो युवा शाखाप्रमुख असेल, हे सगळे गावांमध्ये सतर्क राहिले पाहिजेत. जागरूक राहिले पाहिजेत. अलर्ट राहिले पाहिजेत आणि डोळ्यातील घालून आपल्या संघटनेकरता डोळ्यात तेल घालून जागता पाहारा देणारा शाखाप्रमुख पाहिजे, ही माझी खात्री झाली आहे की, पुन्हा एकदा गावाचा शाखाप्रमुख आपण जागृत केला तर शिवसेनेचे पूर्व वैभव आपल्याला उभा करता येईल, हा माझा विश्वास आहे आणि हे माझं ठाम मत झालं. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील शाखाप्रमुखांची बैठक घेतली अशीही माहिती भास्करराव जाधव यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही याबद्दल जी शंका होती ती सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे दूर झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान काम का झालं याबाबत आता नवीन कारणे समोर येत आहेत. कोकणात मी एकटा निवडून आलो असलो तरीही माझे मताधिक्य प्रचंड कमी झाले. लाडक्या बहीण योजनेचा महिलांवर प्रभाव पडला हे आपल्या लोकांना कळलं नाही, लाडकी बहीण आपल्याला मारक ठरली, असं सगळे म्हणतात. मात्र ज्या दिवशी मतदान होतं, त्या रात्री आपण मतदानाची आकडेवारी काढून अंदाज बांधतो. मग त्यावेळी आपल्याला हा अंदाज आला नाही का ?जी गोष्ट निकाल लागल्यावर लक्षात आली ती मतदान होताना का लक्षात आली नाही? असा सवाल भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. भास्कर जाधव बरं वाटेल असे बोलत नाही, खरं आहे ते बोलण्याचे धाडस दाखवतो, असंही ते यावेळी म्हणालेत.