Bhaskar Jadhav: दिवा विझल्यावर तेल टाकून फायदा नसतो! भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे ठाकरे गटात खळबळ, तर्कवितर्कांना उधाण
Bhaskar Jadhav: ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या भास्कर जाधवांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे.

Bhaskar Jadav: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा असणारे कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा रंगली आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, दिवा विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही, असं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. एकीकडे नाराजीची चर्चा असताना भास्कर जाधवांनी असं सूचक स्टेटस ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
भास्कर जाधव स्टेटसद्वारे नेमकं काय म्हणाले? (Bhaskar Jadhav Whatsapp Status)
भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसद्वारे म्हणाले की, दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते...विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही. माणसाची तसंच....वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ?, असंही भास्कर जाधव स्टेटसद्वारे म्हणाले. नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम दिल्यानंतर चोवीस तासांच्या आत भास्कर जाधवांनी व्हॉट्सॲप वर दोन वेगळ्या अर्थाचे पोस्ट शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांविषयी भास्कर जाधवांची नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे.
भास्कर जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार-
ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या भास्कर जाधवांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे. खरंच भास्कर जाधव नाराज आहेत का? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे जरी ते माध्यमांसमोर येऊन स्पष्ट करत असले, तरी उद्धव ठाकरे यांची या सगळ्या संदर्भात ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे कधीकधी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. शिवाय आपल्याला काम करण्याची संधी कमी मिळते, याचं कारण आपण हुजूर जी करत नाही, असे भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा भास्कर जाधव करणार असून उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
राजकारणातून निवृ्त्ती घेण्याबाबत भास्कर जाधव काय म्हणाले?
आठवेळा निवडणूक जिंकल्यावर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. मी कोणावर नाराज नाही किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं नाही. माझ्यामध्ये अजूनही लढण्याची धमक आहे आणि संघर्ष करण्याची इर्षा आहे. 2022 साली जी घटना पक्षात घडली, त्यानतंर मी मैदानात जाऊन लढतोय, हे नाराजीचे संकेत आहेत का? मी अजूनही होतो त्याचठिकाणी ठामपणे पाय रोवून उभा आहे. सातत्याने स्वत:च सर्टिफिकेट देणं, हे मला जमत नाही. मी हे करणार, ते करणार, असं मी सांगत बसत नाही. मी गोष्टी आधी करतो, मग सांगतो. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय, हे कोणालाही सांगता येत नाही. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेत आहे. मी नुसता मैदानात उतरणार नाही तर पक्षाला यश मिळवून देण्यासाठी उतरणार आहे. याला नाराजी कसे म्हणायचे, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.























