Bhaskar Jadhav and Milind Narvekar: सहा खासदार फुटल्यामुळे ठाकरे गटात अस्थिरता निर्माण झाली असतानाच भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वादामुळे पक्षातील दुफळी समोर आली होती. भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) नाराज झाले होते. मिलिंद नार्वेकर यांनी एक खोचक ट्विट करुन भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना टोला लगावला होता. या सगळ्यानंतर भास्कर जाधव यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिलिंद नार्वेकर यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. हा प्रकार निव्वळ गैरसमजातून घडल्याचे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics news)

पहिली सुरुवात झाली ती त्यांच्या गैरसमजातून झाली.  वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रचंड गर्दी लोटली होती. अनेकांना आत जायचं होतं, पण त्यांना जाणं शक्य नव्हतं. ज्यावेळी माझी गाडी आली तेव्हा शिवसैनिकांनी गराडा घातला आणि आम्हालाही आत सोबत घेऊन चला, असे ते म्हणाले. त्यामुळे मी गाडीतून उतरलो आणि लोकांना समजावत आणि प्रसारमाध्यमांशी बोलत हळुहळू गेटच्या आतमध्ये गेलो. त्यावेळी माझा बाईट सुरु केला होता. त्यावेळी कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न सातत्याने वाजत होता, शिवसैनिकांची समोर गर्दी होती, त्यांना आत जायचे होते. हॉर्न बराच वेळ वाजत होता. त्यावेळी गाडीला आत येण्यासाठी गेट उघडले तेव्हा गाडीसोबत आत येण्याचा प्रयत्न करताना काही शिवसैनिक खाली पडले. तेव्हा मी सहजपणे विचारलं की, कोणाची गाडी आहे? तर मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी. माझ्या डोक्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कामकाज करण्याची पद्धत प्रचंड डोक्यात बसली आहे. त्यामुळे मला कुठले नार्वेकर हे मला क्लिक झालं नाही आणि म्हणून मी बोललो नार्वेकर असले तर काय झालं? खरंतर एवढी गर्दी असताना आमच्यासारख्या नेतेमंडळींनी चार पावलं लोकांसोबत चाललं पाहिजे, हा माझ्या बोलण्याचा प्रमुख हेतू होता, असे स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिले.

पण मिलिंद नार्वेकर यांना कोण नार्वेकर? हा शब्द लागला.  नार्वेकर यांना मी कणखर समजतो, नार्वेकर यांचे सगळ्या पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. नार्वेकर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांची गाडी समजून मी ते बोललो नाही. त्यांनी जे ट्विट केलं, त्या सगळ्या पक्षातील संबंधांचा उपयोग ते मला विरोधी पक्षनेते करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणार असतील तर मला आनंद आहे. मला विरोधी पक्षनेता न केल्यामुळे कोणाला काही त्रास होतोय, मला वाटतं मिलिंद नार्वेकर यांनाच जास्त त्रास होतोय. याचा मला आनंद आहे. आमचं काही भांडण नाही. नार्वेकरांनी सांगितल्यामुळे मी लवकर विरोधी पक्षनेता होईन, अशी अपेक्षा मला असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.  ते एवढे हळवे असतील मला वाटलं नव्हतं. ते फस्ट्रेट म्हटले तरी मी त्यांना हळवा म्हणतो, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.

Bhaskar Jadhav: नार्वेकर आणि भास्कर जाधवांमध्ये नेमकं काय घडलं?

मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीचा आहे. 19 जून रोजी माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यावेळी एक-एक नेते सभागृहात येत होते. सभागृहाच्या बाहेर असलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेत होते. यावेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर भास्कर जाधव हे बोलत होते. त्यांच्या आजुबाजूला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. भास्कर जाधव कॅमेऱ्यासमोर बोलत असताना मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली.  भास्कर जाधव हे रस्त्यात उभे असल्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या ड्रायव्हरने गाडीचा हॉर्न जोरात वाजवला. सुरुवातीला भास्कर जाधव यांना नेमकं कोण आलं हे कळालं नाही आणि ते गाडीच्या मार्गातून बाजूला होऊन गेटमधून आत आले. त्यानंतर त्यांना ती गाडी मिलिंद नार्वेकर यांची असल्याचे समजले. तेव्हा भास्कर जाधव हे उद्वेगाने 'नार्वेकर कोण लागून गेला?', असे बोलून गेले. त्यांचे हे वाक्य कॅमेऱ्यात टिपले गेले.

मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्या नेमक्या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी खोचक कॅप्शनही लिहली आहे. Frustration! माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, असे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे. मिलिंद नार्वेकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.