Beed: धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्याचा प्लॅन आत्मघातकी असल्याचा साक्षात्कार हास्यस्पद आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित (Amarsinh Pandit on Jayant Patil) यांनी जयंत पाटील यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय. धनंजय मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पक्षाला बळकटी दिली त्यांच्या पक्षातील प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार आहे, असं अमरसिंह पंडित यांनी म्हटलंय.


पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धनंजय मुंडे यांना घेणे आमचा आत्मघातकी प्लॅन होता असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांनी जयंत पाटलांची चांगलीच हजेरी घेतल्याचे दिसतय. राज्यात सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आढावा बैठका घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. 


मुंडेंच्या प्रवासाचा मी साक्षीदार


धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या दरम्यान घडलेल्या घडामोडी आणि पक्षप्रवेशाच्या आधी झालेल्या बैठका तसेच पक्षप्रवेशानंतर झालेल्या बैठकांचा व त्यांच्या एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच बळकटी देण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केलेले आहेत, असं ते म्हणाले.


काय म्हणाले सरचिटणीस अमरसिंह पंडित?


अनेक आंदोलने मोर्चे विविध यात्रा धनंजय मुंडे यांनी सबंध महाराष्ट्रभर यशस्वी करून दाखवल्या. त्याचबरोबर 2014 ते 19 या कालावधीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केले ज्याचा मोठ्या प्रमाणात पक्षाला फायदा झाला. आज इतक्या वर्षांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्याचा प्लॅन हा आत्मघातकी होता असा साक्षात्कार उर्वरित पक्षातील एखाद्या नेत्याला होत असेल तर ते अत्यंत हास्यास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या जयंत पाटलांच्या टीकेचा समाचार घेतलाय. 


जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी बीड दौऱ्यावर आले असता त्यांनी धनंजय मुंडे यांचा काही वर्षांपूर्वी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा आमचा आत्मघातकी प्लॅन ठरला अशा स्वरूपाची टीका केली होती. त्यावर ज्येष्ठ नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


हेही वाचा:


Jayant Patil : 'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन', जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य