सोलापूर : देशात आणि राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत कधी युती करेल किंवा कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल, याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन शिवसेनेला (Shivsena) एकत्र आणण्याचं काम बार्शीचे (barshi) आमदार दिलीप सोपल यांनी केलंय. कारण, येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. या निर्णयाने राज्यभरातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता, याप्रश्नी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी भूमिका स्पष्ट केली. बार्शीचा निर्णय हा पक्षाचा निर्णय नसून तेथील आमदारांनी त्यांच्या सदसद्वविवेकाला स्मरुण घेतलेला आहे, असे अंधारे यांनी सांगितले. 

शिवसेना युबीटी पक्षाची भूमिका ही आहे की, बार्शीचा निर्णय हा तिथल्या आमदारांनी त्यांच्या विवेकाला अनुसरून घेतला आहे, हा पक्ष संघटनेचा निर्णय नाही. पक्षप्रमुखांनी मला सांगितलं आहे के ते स्वतः आमदारांशी बोलणार आहेत. आम्ही एकटे लढतोय, जो जो भाजपला हरवण्यासाठी लढतोय त्यांच्या सोबत आम्ही लढतोय. बार्शीची युती, आमची युती नाही. बार्शीला आमदार आहेत, तिथं जर माझी गरज वाटली तर पक्षप्रमुखांना बोलून मी ठरवेन, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी बार्शीतील दोन शिवसेना एकत्र येण्याबाबत मांडली. तसेच, भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. 

भाजप हा काही धुतल्या तांदळाचा पक्ष नाही, फक्त त्यांच्याकडे पैसा मोक्कार झालाय. मनी-मसल त्यांच्याकडे जास्त आहे. पण, त्यांचा सामना करण्यासाठी मेंटल पॉवर आमच्याकडे जास्त आहेत. मी अत्यंत साधी आणि चळवळीतील कार्यकर्ता आहे, मी महिला असल्याचे विक्टिम कार्ड कधी खेळत नाही. सोबत काम करणाऱ्यांना देखील माझं सांगणं आहे की, मला बाई समजून हलक्यात घ्यायचं नाही, घेतलं की मग अडचण होईल. मी आई बहिण म्हणून वागणारी आहे. पण, संघटनेच्या बाबतीत कामं करताना दृढ आहे. त्यामुळे शिवसेनेत पाहिल्यांदा एका महिलेले जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून पद दिलं आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 

जे लोकं भाजपत गेले त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न काय? दिल्या घरी सुखी राहा असं म्हणायचं. उद्धव ठाकरे बागेश्वर बाबा नाहीत, एकचवेळी चार ठिकाणी दिसायला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधी नेमलेले आहेत, ते त्यांची जबाबदारी पार पडताय. जर त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही, तर त्यांच्यावर कारवाईची सुरुवात आजपासून होईल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. भाजप ही नेते चोरणारी आहे, तर शिवसेना ही नेते घडवणारी आहे. शिवसेना लढत राहिल, 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करुन पुढे जणारा शिवसेना पक्ष आहे. सोलापूर हा काँग्रेसचा गड होता, काँग्रेसला ओव्हरटेक करुन भाजप इथे आला, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवरही जोरदार हल्लाबोल केला. 

जयकुमार गोरेंना खोचक टोला

जयकुमार गोरे हे प्रणिती शिंदेंबाबत जे बोलले यात काय विशेष? तो भाजपा संस्कार आहे. कुलदीप सिंगरची मिरवणूक काढणारी भाजप आहे, बदलापूर तुषार आपटेला स्वीकृत करणारी भाजपा आहे. त्यामुळे, गोरे यापेक्षा वेगळं वागले असते तर बातमी झाली असती. प्रणितीताई माझ्या भगिनी, मी काहीच बोलणार नाही हे गोरेंनी म्हटलं तर बातमी होईल, असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला. 

कमळाचा हिरवा देढ एमआयएम आहे का?

इम्तियाजभाई बद्दल मला आदर आहे, पण त्यांचं जे सुरूय ते पाहता मला एक शब्दही बोलायचं नाही. स्क्रिप्टेड गेममध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. भाजपचा झेंडा हा भगवा आणि हिरवा आहे, कमळमध्ये देखील खालचा देठ हिरवा आहे. हा हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? असा प्रतिसवाल सुषमा अंधारे यांनी इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन केला.

हेही वाचा

पुणे महापालिकेत शून्य जागा, दारूण पराभव झालेल्या मनसेत मोठी उलथापालथ होणार; राज ठाकरे भाकरी फिरवणार