Baramati Byelection Congress Candidate Akash More: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे (Baramati Bypoll 2026) सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने सुरुवातीला प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होता. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, काल संध्याकाळी काँग्रेस हायकमांडने दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आकाश मोरे (Akash More) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Who is Congress Baramati bypoll candidate Akash More)
आकाश मोरे हे वकील आहेत. त्यांचे वडील विजय मोरे हे विधानपरिषदेचे आमदार होते. आकाश मोरे यांनी 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. आकाश मोरे हे विधान परिषदेचे माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र आहेत. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने असल्याने काँग्रेसने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. विजयराव मोरे हे त्यावेळी बारामतीमध्ये शरद पवार विरोधक म्हणून ओळखले जात. शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले नाहीत. त्यांनी बारामतीत काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला. आकाश मोरे हेदेखील वडिलांचा हाच वारसा पुढे नेत आहेत. हीच गोष्ट ओळखून सुनेत्रा पवार यांच्याशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरे यांची निवड केल्याचे सांगितले जाते.
आकाश मोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव देखील आहेत. आकाश मोरे यांनी बी.ए. एलएलबी हे शिक्षण पूर्ण केले असून गेल्या 15 वर्षांपासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकिली करत आहेत. याशिवाय, ते बारामती तालुक्यातील मोर्टी येथील आश्रम शाळेमध्ये सदस्य म्हणून कार्य करत आहेत. बारामतीमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते वसतिगृह चालवतात. याशिवाय, त्यांच्या मूळ गावी भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी निवासी आश्रमशाळा ते चालवतात.
BJP in Baramati: भाजप बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ताकद उभी करणार, बावनकुळे अर्ज भरण्यासाठी येणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील. बारामतीमध्ये भाजप त्यांच्यापाठी आपली सर्व ताकद उभी करणार आहे. सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार असल्याने भाजपकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या तामिळनाडू आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत बावनकुळे बारामतीला सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असतील.
आणखी वाचा
