Bal Mane Vidhan Parishad Election 2026: कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. यावेळी बाळ मानेंसोबत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरेसेनेत कमालीचा रोष पाहायला मिळाला. बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख केला. या सगळ्या घडामोडींतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
बाळ मानेंसाठी महायुतीची विशेष फिल्डिंग पाहायला मिळत आहे. बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करताच चार्टर्ड विमानाने बाळ माने मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुंबईत आल्याची सूत्रांची माहिती आहे. बाळ माने यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आपल्याला महायुतीकडून दबाव येत होता, असा दावा केला. बाळ माने यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती अर्ज दाखल केल्यानंतर सांगून सुद्धा कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. दुसरीकडे अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीकडून दबाव वाढत होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीतील कोकणातील बाळ मानेंसोबत मागील तीन-चार दिवसांपासून सतत चर्चा करत होते. (Bal Mane Vidhan Parishad Election 2026)
बाळ मानेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित- (Bal Mane Vidhan Parishad Election 2026)
मंत्री नितेश राणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे. ताकद नसताना आपण का उभे राहतात? असा प्रश्न सुद्धा विचारला जात होता. त्याशिवाय महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून सुद्धा मदत मिळत नव्हती. त्यामुळे अखेर बाळ माने यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. हाकालपट्टी होताच मंत्री नितेश राणे यांच्यासोबत ते थेट विमानाने मुंबईत आले. आता बाळ मानेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. येत्या काही दिवसात बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बाळ माने लवकरच भेटतील अशी माहिती आहे.
कोण आहेत बाळ माने? (Who Is Bal Mane)
बाळ माने हे मूळचे रत्नागिरीचे असून ते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते. बाळ माने सुरुवातीला भाजपमध्ये होते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जागा न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आणि उदय सामंत यांच्याविरुद्ध 2024 मधील विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र उदय सामंत समोर बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नावं- (Names of candidates elected unopposed)
1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)
1. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
4. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
5. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
6. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
7. नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )
9. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)
12. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
