Bal Mane Vidhan Parishad Election 2026: कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला अर्ज मागे घेतला. यावेळी बाळ मानेंसोबत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरेसेनेत कमालीचा रोष पाहायला मिळाला.

बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख केला. काल घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर आज बाळ माने यांनी व्हॉट्सअॅपवर दोन स्टेटस ठेवले आहेत. बाळ मानेंनी ठेवलेल्या स्टेटसची सध्या राज्यभर चर्चा आहे. 

बाळ माने यांच्या दोन स्टेटसची चर्चा- (Bal Mane Konkan Vidhan Parishad)

कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे दोन स्टेस्टस चर्चेत आहेत. यामध्ये मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो,  त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट वेस्ट आँफ टाईम...( बदला हा वेळेचा अपव्यय आहे), असं बाळ माने यांनी स्टेटसद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसऱ्या स्टेटसद्वारे बाळ माने यांनी आरएसएसचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं आहे. 

पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध- (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी काल अखेरचा दिवस होता. पाच ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत.

अनिकेत तटकरे काय म्हणाले? (Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026)

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच सुनील तटकरे महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारी आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन. जनसेवा, विकास आणि लोकहिताच्या कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून आपण सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, अशी पोस्ट अनिकेत तटकरे यांनी केली आहे.

बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नावं- (Names of candidates elected unopposed) 

1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप

2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस

3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना

4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना 

राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)

1. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) 

2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)

3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

4. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

5. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस) 

6. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)  विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

7. नाशिक :  गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध  नरेंद्र दराडे  (शिवसेना)

8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा  (वंचित )

9. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष) 

11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

12. नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

संबंधित बातमी:

Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...