Babanrao Lonikar : भाजपा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका भाषणादरम्यान सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. "कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना अंधभक्त म्हणतात," असे म्हणत त्यांनी टीकाकारांवर सडकून टीका केली. या तरुणांविषयी बोलताना, "हीच कार्टी कूचवट्यावर बसून चर्चा करत असते, आणि त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच दिलं आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, "नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले," असेही वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. आता बबनराव लोणीकर यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

बबनराव लोणीकर म्हणाले की, गाव पातळीवरचे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे मोदीजींना आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करतात. त्यांच्याविषयी मी बोललो. हे राजकीय पक्षाचे 10 जणांच्या टोळके, विरोध करतात. आमची खेड्यातली भाषा आहे. आम्ही वडिलांना बाप म्हणतो, आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केलं नाही, तू नीट शिकत नाही तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. आमच्या ग्रामीण भाषेत मी बोललो आहे. मी कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात 40 वर्षात बोललो नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, असे त्यांनी म्हटले. 

माझ्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही

बबनराव लोणीकर पुढे म्हणाले की, राजकीय लोकांना माझ्या वक्तव्याच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. माझ्या विरोधात पळता भुई करू, असे विरोधक बोलत आहेत.  तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी माझं काम सुरूच राहणार आहे. ते थांबणार नाही. मी शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्या 40 वर्षात कधीही बोललो नाही. जनता जनार्दन माझी मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी 25 वर्ष निवडून येत आहे. त्याच्यामुळे मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी हजार वेळा शेतकऱ्यांची माफी मागील. पण, मी बोललेलो नाही. मला शेतकऱ्यांबद्दल आदर आहे. काही लोकांना सहन होत नाही की, हा नेमका निवडून कसा येतो? म्हणून नऊ-दहा लोकांचे टोळके जे राजकीय पक्षांनी पोसलेलं आहे, त्यांचा अतिरेक होत आहे. मी गाव पातळीवरील कार्यकर्त्याविषयी बोललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

संजय राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. जर बबनराव लोणीकर म्हणत असतील की, त्यांचा जन्म मोदींमुळे झाला, सगळ्या गोष्टी मोदींमुळे मिळतात, तर हा थेट जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. पहलगाममध्ये आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच, असा आरोप संजय राऊत यांनी केला. याबाबत विचारले असता बबन लोणीकर म्हणाले की,  ज्यांनी हा महाराष्ट्र नासवला आहे असे संजय राऊत आहेत. मी 40 वर्ष भाजपचे काम केले. संजय राऊत एकेरीवर ज्या पद्धतीने बोलतात, त्यावरून समजून घ्या की हे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी काय संजय राऊत यांच्यासारखा पैसे खाऊन जेलमध्ये गेलेलो नाही. या लोकांनी मला धमक्या देऊ नयेत. मी धमक्यांना घाबरणारा नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने आहे, म्हणून मी उभा आहे. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? हर्षवर्धन सपकाळ कुठे होते? कुठून आले? आणि प्रदेशाध्यक्ष कसे झाले? अंबादास दानवे निवडून कसे आले? असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांना समज देण्यात येईल! देवेंद्र फडणवीसांनी लोणीकरांना 'त्या' मुजोर वक्तव्यावरून फटकारलं, म्हणाले...