Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) बलात्कार प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळताना दिसत आहे. तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी सोशल मीडियावरून चाकणकर यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

Tushar Bhosale on Rupali Chakankar: नेमकं काय म्हणाले तुषार भोसले? 

तुषार भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करत म्हटले आहे की,  याच चाकणकर बाई , काही दिवसांपूर्वी ज्ञान पाजळत होत्या की, आम्ही महिलांना पोथी-पुराणात अडकवून ठेवले. अहो, पण तुमच्यासारखे असल्या भोंदूंच्या नादात अडकण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन आणि अनुकरण करणे हे कितीतरी पटीने चांगले आहे. म्हणून आमच्या माय-माऊलींना उपदेश देण्यापेक्षा आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करा, अशी टीका त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केलीय.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीने अशा व्यक्तीशी संबंध ठेवणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

नाशिकमध्ये अशोक खरात याच्याविरोधात एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने 18 मार्च रोजी पहाटे त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयावर छापा टाकून एक पेन ड्राइव्ह जप्त केला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर दिशेने सुरू आहे.

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून ओळख निर्माण करत होता. राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती आहे. मात्र, या अटकेमुळे त्याची प्रतिमा धुळीस मिळाली असून समाजात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि प्रभावशाली व्यक्तींवरील विश्वास याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime News: अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी अन् 5 कोटीची खंडणी; वासनांध अशोक खरातवर तीन गुन्हे दाखल, राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता तपास थेट...