Ashok Kharat and Rupali Chakankar:नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics)

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन देणार आहेत. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेतली. या भेटीचे कारण आणि इतर तपशील अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत अशोक खरात प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची बैठक झाली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरातशी असलेल्या संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बदनामी कशी थांबवायची, याबाबत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. या बैठकीतून रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात होती. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी, 'कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही', असे सूचक वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदाराची बैठक होणार आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित असतील. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनाम्याच्या संदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आजच्या बैठकीमध्ये आमदारांना काही महत्वाच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

अरे तू काय केलं, ती महिला प्रेग्नंट झाली...; अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन, पुढे काय घडलं?