नवी दिल्ली : महाराष्ट्र्र काँग्रेसने केलेल्या टीकेवर भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपण कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही, परंतु काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये (Women Reservation Bill) खोडा घालण्याचं कारण नव्हतं असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात गैर काय? मतदारसंघांमध्ये समानता आणली पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
मला मान्य आहे की काँग्रेसच्या काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कुणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझी टीका वैयक्तिक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला. त्याचं काहीही कारण नव्हतं, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले की, "अमित शाह यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारची सगळी राजकीय तयारी केली, सर्व स्पष्ट केलं. मतदारसंघ पुनर्रचनेतून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केलं. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यासंदर्भात विरोधकांच्या मदतीची आवश्यक होती. महिला आरक्षणाचा महत्वाचा भाग होता. पण या निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक केली."
काँग्रेसकडे केडर शिल्लक नाही
अशोक चव्हाण म्हणाले की, "अनेक राज्यांत कांग्रेसची 20-20 वर्षे झाली, तरी सरकारं नाहीत. अनेक राज्यात काँग्रेसकडे खाली केडर शिल्लक नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला याच्याशी काही घेणेदेणे नाही. काँग्रेसला काहीही भवितव्य नाही, त्यामुळे त्यांच्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये यायला तयार आहेत."
अशोक चव्हाण म्हणाले की, "मी भाजपमध्ये असलो तरीही काँग्रेसच्या विरोधात मुद्यांवर बोलतो. सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे, काँग्रेसकडे काही मुद्दाच राहिला नाही. मी काँग्रेस सोडल्यामुळे काही लोकांना चागलं वाटतं, कारण मी गेल्याने त्यांना संधी मिळाली. काही लोक खासगीमध्ये सांगतात की भाजपमध्ये यायचं आहे. किती दिवस विरोधात रहायचं असं बोलतात."
काँग्रेसची अशोक चव्हाणांवर टीका
दरम्यान, काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठिंब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले आहे.
आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी33 % आरक्षण लागू केलं व नंतर 50 % आरक्षणही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या!
ही बातमी वाचा:
