Dharashiv: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह घेऊन पराभूत झालेल्या अर्चना पाटील (Archana Patil) या जिल्हा परिषदेवर कमळाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं भाकीत देखील अर्चना पाटील यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन देखील त्या पराभूत झाल्या. 'मी कशाला राष्ट्रवादी वाढवू' असं निवडणुकीदरम्यानच त्यांचे वक्तव्य ही चर्चेत आलं होतं. आता त्यांनी 'जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन दिवसात लागतील व जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा कमळाचा झेंडा फडकवायचा' हे वक्तव्य केल्याने या वक्तव्यावरूनही राजकीय चर्चा रंगणार असल्याचे दिसत आहे. 

काय म्हणाल्या अर्चना पाटील?

" जिल्हा परिषद नंतर बघू. आज यांचा दिवस आहे. आज नगरपालिका आली आहे. शहर आलं आहे. दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. जिल्हा परिषदेची तयारी सुरू आहे. एक-दोन दिवसात लागेल निवडणूक. जिल्हा परिषदेवर कमळाचा झेंडा फडकवायचा आहे. पण आज नगरपालिका आल्याचा आनंद होतोय." असं अर्चना पाटील म्हणाल्या.

लोकसभेत अर्चना पाटील यांचा दारुण पराभव

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी अडचण पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले होते. तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी त्यांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. माझा नवरा भाजपचा (BJP) आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलं होतं. आता जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषदेवर कमळाचा झेंडा फडकवायचा आहे असं त्या म्हणाल्यात त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणूका कधी लागणार?

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याची वेळ दिलेली आहे. राज्यातील प्रलंबित 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर व्हायचा आहेत. वीस जिल्हा परिषदेत आणि 211 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे या ठिकाणाच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे . 6 ते 8 जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.