मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली असतानाच, तिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेनं (MNS) शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सत्तेत असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही, असे म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी या युतीवर प्रतिक्रिया दिली. तर, बाळा नांदगावकर यांनीही एकप्रकारे हा स्थानिक युतीचा विषय असल्याचे सांगत याचे समर्थन केले आहे. आता, केडीएमसीमधील युतीवर शिवसेना (shivsena) ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि नेते अनिल परब यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी केडीएमसीतील शिवसेना-मनसे युतीवरही भाष्य केलं. यासंदर्भात , राज ठाकरेंशी संवाद झाला, काही लोकांना काही भेटलं नाही, त्यातूनही ही भूमिका घेतली, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर, अनिल परब यांनीही केडीएमसीतील युतावर भाष्य केलं. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेली भूमिका ही त्यांची आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. मात्र, आमचे नगरसेवक आमच्यासोबत आहेत. मुंबईतील सर्व नगरसेवक आले आहेत, काही येत आहेत, असे म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी कल्याण डोंबिवलीतील शिवसेना-मनसे युतीवर भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील शिवसेना नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी अनिल परब यांच्यासह नवनिर्वाचित नगरसवेक आज कोकण भवनला पोहोचले आहेत. दरम्यान, नॉट रिचेलबल असलेल्या डॉ.सरिता म्हस्के ह्या माझ्या संपर्कात आहेत, थोड्याच वेळात तुम्हाला त्या या ठिकाणी आलेल्या दिसतील. थोड्याच वेळात आमची गट नोंदणी केली जाईल, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली.
फुटीर नगरसेवकांवर कारवाई करावी
चिन्हावर निवडून येऊन बेडूक उडया मारत असेल तर पक्षनेतृत्वाने कारवाई करायला हवी, आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे MIM आहे. सत्तापिपासू लोक आमच्यासाठी MIM आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी मुंबईतील आणि कल्याण डोंबिवलीतील फुटलेल्या नगरसेवकांवर हल्लाबोल केला. माझावरही ईडी कारवाई झाली, पण मी मागे हटलो नाही, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली. दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने आजही माती खाल्ली, आज तारीख ठरलेली असताना तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
पवन कदम शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते
ठाण्यात शिवसेना नगरसेवकांची बैठक पार पडली असून खासदार नरेश म्हस्के, शहराध्यक्ष हेमंत पवार, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक आनंद आश्रम येथे आले होते. या बैठकीत नगरसेवक पवन कदम यांची शिवसेनेचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे, उद्या कोकण भवन येथे शिवसेना नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी जाणार आहेत.
