Anil Deshmukh:महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांमधील गोंधळ, गैरप्रकार आणि औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारने घोषित केलेल्या न्यायिक चौकशीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ विद्यार्थ्यांचा असंतोष शमवण्यासाठी आणि आंदोलन शांत करण्यासाठीच 'न्यायिक चौकशी'चे आश्वासन दिले जात आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

Continues below advertisement

दरम्यान, न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल आयोगाच्या (Justice KU Chandiwal Commission) अनुभवाचा हवाला देत अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, MPSC गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्यपालांकडे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी करणे हे स्वागतार्ह असले, तरी अशा चौकशीचा अहवाल MPSC च्या युवकांच्या तोंडाला पाने पुसणारा ठरू नये. 1400 पानांचा अहवाल धूळ खात पडून तत्कालीन राज्य सरकारने मार्च 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या आयोगाने 13 महिने सखोल चौकशी करून 1400 पानांचा अंतिम अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी स्वतः 13 वेळा सरकारकडे आणि 2 वेळा राज्यपालांकडे लेखी पत्रव्यवहार केला, तरीही शासनाने तो अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही किंवा विधिमंडळाच्या पटलावरही ठेवलेला नाही, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

Anil Deshmukh to Devendra Fadnavis: अनिल देशमुख यांच्या मुख्य मागण्या काय?

Continues below advertisement

• चांदिवाल आयोगाचा अहवाल तात्काळ जाहीर करा: न्यायिक आयोगाच्या अहवालावर शासन गांभीर्याने कारवाई करते, हा विश्वास जनतेत निर्माण करण्यासाठी न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाचा 1400 पानांचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून विधिमंडळात सादर करण्यात यावा.

• MPSC अध्यक्षांचा राजीनामा घ्या: पदावर कायम असताना निष्पक्ष चौकशी होणे शक्य नाही. त्यामुळे चौकशी सुरू करण्यापूर्वी MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा.

• चौकशीची मुदत निश्चित असावी: MPSC साठी स्थापन होणाऱ्या न्यायिक चौकशीची मुदत 2 ते 3 महिने अशी निश्चित असावी आणि अहवाल प्राप्त होताच तो विनादबाव सार्वजनिक केला जावा.

• मुख्य सूत्रधारांवर SIT/पोलीस कारवाई सुरूच राहावी: चौकशी आयोगाच्या नावाखाली मुख्य आरोपी व पेपरफुटीतील सूत्रधारांवरील पोलीस किंवा SIT ची कारवाई मंदावता कामा नये.

न्यायिक आयोगांच्या अहवालांवर जनतेची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती अनिल देशमुख यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.