Anantrao Thopate: पुण्यातील सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) परिसरात शनिवारी कमालीचा तणाव पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अनंतराव थोपटे (Anantrao Thopte) यांच्या सर्वपक्षीय शोकसभेचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालल्याने, पुढील नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या प्रेक्षकांची मोठी गैरसोय झाली. तब्बल दोन तास नाट्यप्रयोग खोळंबल्यामुळे संतप्त झालेल्या नाट्यरसिकांनी आणि शोकसभेला आलेल्या नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर पोलीस आणि आयोजकांच्या मध्यस्थीने वाद निवळला.
Anantrao Thopate: नेमका काय घडला प्रकार?
बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी 'आमने-सामने' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. हजारो रसिकांनी आगाऊ तिकीट काढून नाटकासाठी गर्दी केली होती. मात्र, त्याच वेळी नाट्यगृहाच्या आत स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय शोकसभा सुरू होती. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांची भाषणे आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ चालल्याने नाटकाची वेळ झाली, तरी प्रेक्षकांना आत सोडण्यात आले नाही.
तब्बल दोन तास उलटूनही नाटक सुरू न झाल्याने तिकीट काढलेले प्रेक्षक संतप्त झाले. नाट्यगृहाबाहेर नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. याच दरम्यान शोकसभेला आलेल्या काही नागरिकांशी प्रेक्षकांची शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Sharad Pawar: अनंतराव थोपटे हे गरीब लोकांचे नेते: शरद पवार
या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी अनंतराव थोपटे यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक श्रद्धांजली वाहिली. "आयुष्यभर समाजासाठी काम करणारे नेते म्हणजे अनंतराव थोपटे होते. अण्णासाहेब मगर, शंकरराव मोहिते आणि अनंतराव थोपटे यांनी पुणे जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व केले, त्यानंतर आम्ही राजकारणात आलो. ते नेहमी काँग्रेस विचारसरणीशी बांधील राहिले आणि माझ्या संपूर्ण राजकीय वाटचालीचे ते साक्षीदार होते," अशा शब्दांत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पवारांनी थोपटेंच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांची पहिली निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे उभ्या असलेल्या उषाताई चौधरी यांच्या विरोधात होती. त्यांच्यावर जनता नाराज होती. त्यामुळे अनंतराव थोपटे यांना जनतेने अपक्ष उमेदवार असताना देखील निवडून दिले. भोर, वेल्हा, मुळशी भागात भौगोलिक आव्हान होते. डोंगरी भागात त्यांनी सहकार पसरविला. त्यानंतर काँग्रेस पक्षाला लक्षात आले की, त्यांना संधी दिली पाहिजे. त्यानंतर त्यांना संधी मिळाली आणि अनंतराव थोपटेंच्या नेतृत्वाखाली विकास झाला. त्यांनी शिक्षण संस्था, सहकारी बँक आणि साखर कारखाने स्थापन केले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले, लोकांना रोजगार मिळाला. दुग्ध विकासाचे जाळे त्यांनी निर्माण केले. गुजरातच्या धर्तीवर मुंबईत वरळी येथे दुग्ध विकास मंडळाचे कार्यालय त्यांनी उभे केले. गरीब लोकांचा नेता अशी ओळख असलेल्या अनंतराव यांच्या स्मृतीस अभिवादन करतो, असे त्यांनी म्हटले.
Anantrao Thopate: शरद पवारांच्या भाषणानंतर शोकसभा संपली, परिस्थिती सुरळीत
शरद पवार यांच्या भाषणानंतर स्वर्गीय अनंतराव थोपटे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शोकसभेची सांगता झाली. यानंतर व्हिआयपी नेत्यांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची गर्दी ओसरल्याने बालगंधर्व परिसरातील वातावरण शांत झाले. त्यानंतर विलंबाने का होईना, नाटकाचा प्रयोग सुरू करण्यात आला. परंतु, अशा संवेदनशील आणि गर्दीच्या कार्यक्रमांचे नियोजन करताना नाट्यगृहाच्या प्रशासनाने वेळेचे भान का राखले नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करत नाट्यरसिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
