Anand Paranjpe on Sunetra Pawar Letter: सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुतीत (Mahayuti) जागावाटपावरून (Seat Sharing) जोरदार खलबतं सुरू असून तिन्ही पक्षांतील सर्वोच्च नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. एकीकडे जागावाटपाचे गुऱ्हाळ चाललेले असतानाच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या एका पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना (Shivsena) पक्षाचे नेते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांची एका महत्त्वपूर्ण पदावरील नियुक्ती थांबवावी, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद परांजपे यांना म्हाडाचे (MHADA) उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचे सांगितले जात आहे. आनंद परांजपे यांची म्हाडाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करू नये; त्याऐवजी आम्ही लवकरच तुम्हाला दुसरे नाव सुचवू, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Anand Paranjpe: आनंद परांजपे यांनी दिला होता राष्ट्रवादीचा राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून आनंद परांजपे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. 14 मे रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या होत्या. विशेष म्हणजे, विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचा कयास लावला जात होता. राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांनी अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. ते शिवसेनेत जाताच आता सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे म्हटल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या पत्रावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Anand Paranjpe on Sunetra Pawar Letter: आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणी आनंद परांजपे यांनी परभणीत उत्तर दिले असून, "मी 14 वर्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे त्यांनी पत्र दिले असले तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही कटुता नाही. आता मी शिवसेनेत स्वगृही परतलो आहे, आता इथला पक्ष कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. इथेही मला कुठल्याही पदाचे आश्वासन देण्यात आले नाही. माझे श्रद्धास्थान अजितदादा आहेत. मी तो पक्ष सोडला, त्यांनी पत्र दिले म्हणून मी नाराज नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
