Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
गरब्यामध्ये जाण्यासाठी मुस्लिम मुलं हिंदू नाव सांगतात, कपाळावर टीळा लावतात आणि हिंदू भगिनीला फसवतात. आमच्या भगिनीला लग्नानंतर हे सगळं कळतं.

चंद्रपूर/मुंबई : सध्या सण-उत्सवांचा सिझन सुरू झाला असून गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्रीची तयारी सुरू झाला आहे. एकीकडे गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावरुन वाद सुरू असतानाचा, आता नवरात्रीत गरब्यातील प्रवेशावरुन वाद सुरू झाला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांसह मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गरबा (Garba) खेळण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको, मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी होत आहे. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली परखड भूमिका मांडली. आपला उत्सव सर्वांचा समावेश करतो, एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही, असे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटले.
गरब्यामध्ये जाण्यासाठी मुस्लिम मुलं हिंदू नाव सांगतात, कपाळावर टीळा लावतात आणि हिंदू भगिनीला फसवतात. आमच्या भगिनीला लग्नानंतर हे सगळं कळतं. त्यामुळे, यातून वाचण्यासाठी, हिंदू बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको, अशी मागणी झालीय, असे नितेश राणेंनी म्हटलं होतं. नितेश राणेंच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी परखडपणे भूमिका मांडली. आपला उत्सव सर्वांचा समावेश करतो, एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही, असे अमृता फडणवीस यांन म्हटले.
धर्माचं पालन घरात जेवढं करू तेवढं चांगल
सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना डीजे वाजवण्यावरुन चांगलच वादंग पाहायला मिळत आहे. त्याच, अनुषंगाने अमृता फडणवीस यांना विचारले असता, सरकार आणि कोर्टाने जे नियम ठरवून दिले आहे त्याप्रमाणे सर्वांनी सणवार साजरी करावे. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या लोकांना त्रास व्हायला नको, धर्माचे पालन घरात जेवढं करू तेवढं चांगलं, बाहेर जे सणवार साजरे करतो ते नियमात राहून केले पाहिजे, अशी भूमिका अमृता फडणवीसांनी मांडली.
दहीहंडी उत्सवात महिलांचा डान्स योग्य नाही
दहीहंडी फोडताना महिलांचा जो मनोरा तयार केला जातो, ती एक समानतेची गोष्ट आहे. पण तिथे तुम्ही स्त्रियांना वेडे वाकडे डान्स करवाल तर ते मला योग्य वाटत नाही. जिथे जे योग्य वाटतं तेच करावं, असे म्हणत दहीहंडी उत्सवात महिलांच्या डान्सवरुन सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेवरही अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. तसेच, एकप्रकारे संभाजी भिडे यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचे समर्थनही केले.
कार्यक्रमातील गोंधळाबाबत दिली माहिती
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या त्यांच्या कार्यक्रमातील गोंधळाबाबतही त्यांनी माहिती दिली. मला माहित नाही ती स्त्री कुठून आली, ती अचानक आली आणि गायब पण झाली. बीच क्लब समोर ज्या गाड्या पार्क केल्या होत्या, त्या पंधरा मिनिटात निघून पण गेल्या होत्या. त्यामुळे हे माहीत करावं लागेल की हा पब्लिसिटी स्टंट आहे की तिला खरच त्रास झाला, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















