Amravati Vidhan Parishad Election 2026: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies) 17 जागांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे (Legislative Council Election) बिगुल वाजले असून, अमरावती जिल्ह्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. भाजपचे (BJP) नेते प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याने उघड विरोध दर्शवल्यामुळे महायुतीमधील (Mahayuti) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या (Yuva Swabhiman Party) कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. "अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध उद्योजकाची रिंगणात दमदार उडी", असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिला आहे. मात्र, हा बडा 'प्लेअर' (Player) नेमका कोण? याचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Amravati Vidhan Parishad Election 2026: राणांचा नेमका 'प्लॅन' काय? अंतर्गत हालचाली वाढल्या

यापूर्वी आमदार रवी राणा हे त्यांचे बंधू सुनील राणा यांना निवडणूक (Election) रिंगणात उतरवणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता एका प्रसिद्ध उद्योजकाच्या (Industrialist) नावाची पोस्ट व्हायरल झाल्याने राणा नेमकी कोणती खेळी खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, प्रवीण पोटे यांना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक बड्या नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. राणा हे केवळ महायुतीतच नव्हे, तर विरोधी पक्षातील काँग्रेस (Congress) नेत्यांच्याही संपर्कात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

Amravati Vidhan Parishad Election 2026: भाजपकडून पोटे आणि धांडे इच्छुक 

अमरावती मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह शहराध्यक्ष नितीन धांडे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतर्फे (MVA) काँग्रेस ऐनवेळी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रवीण पोटे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला टक्कर द्यायची असेल, तर काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी स्वतः निवडणूक लढावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत आहे. त्यातच, शिवसेनेचे (ठाकरे गट) अकोला येथील माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Amravati Vidhan Parishad Election 2026: आकडेवारीत महायुती 'सेफ झोन'मध्ये, पण...

संख्याबळाचा विचार केला तर अमरावती विधान परिषदेची जागा महायुतीसाठी पूर्णपणे सुरक्षित (Safe Zone) मानली जात आहे.

एकूण मतदार (Total Voters): 453

महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी): जवळपास 248 मते

महाविकास आघाडी (काँग्रेस+ठाकरे गट+शरद पवार गट): जवळपास 152 मते

अपक्ष आणि इतर पक्ष: 53 मते

मॅजिक फिगर पार करण्यासाठी महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असले, तरी आमदार रवी राणा यांची भूमिका आणि छोटे घटक पक्ष काय निर्णय घेतात, यावर येथील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

Vidhan Parishad Election 2026: जागावाटपावरून महायुतीत पेच 

दुसरीकडे, राज्यातील 17 जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला, तरी सध्या जागावाटपावरून (Seat Sharing) महायुतीमध्येच पेच निर्माण झाला आहे. प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना (शिंदे गट) 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागा लढवणार असे ठरले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने थेट 7 जागांवर आपला ठाम दावा ठोकला आहे. या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बहुतांश जागांवर एकमत झाले असले, तरी एका जागेवरून घोडं अडलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या अंतिम बैठकीत तोडगा निघणार आहे. त्यामुळे महायुतीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील