PM Modi and Amit Thackeray: पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. याठिकाणी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्टस कोट्यातली खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

अमित ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्याच्या कृतीचे समर्थन केले. एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेऊ नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण मग मोदींचा फोटो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला नको. भाजपचे नेते याचा निषेध करत असतील तर त्यांना विचारा की, तुम्हाला छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही. उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल, मोदी आणि शिवरायांचा फोटो बाजूला लावण्याच्या निर्णयाचे समर्थन भाजपचे नेते तरी करणार आहेत का, असा प्रतिसवाल अमित ठाकरे यांनी विचारला.

Navnath Ban: अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करा: नवनाथ बन

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचे काम अमित ठाकरे यांनी केले, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. सरकारी कार्यालयात प्रोटोकॉल असतो. मोदींचा फोटो काढण्यापूर्वी अमित ठाकरेंनी प्रोटोकॉल वाचायला हवा होता, ते मनसेचे नवीन नेते आहेत. ते नव्याने घराच्या बाहेर पडले आहेत, घरात बसणाऱ्यांना प्रोटोकॉल माहिती नसतो, असा टोला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी लगावला.

अमित ठाकरे हे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेटी देऊन gen z विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या,अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित विविध अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थीनी सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर सर्रासपणे होणाऱ्या सिगारेट व गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी, तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Pune news:  अमित ठाकरेंना प्रोटोकॉल माहिती नसेल, भाजपच्या गणेश बीडकरांची प्रतिक्रिया

तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून तो भारताच्या पंतप्रधानांचा फोटो आहे. प्रोटोकॉनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात पंतप्रधान, राष्ट्रपतींचे फोटो लावणे हे बंधनकारक असते. कदाचित अमित ठाकरेंना हे माहिती नसेल प्रोटोकॉल काय असतो किंवा ते या देशाच्या पंतप्रधानांनाच मानत नसतील. त्यांच्या या कृत्याचा मी निषेध करतो. पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. ते कुठल्या पक्षाचे नसतात, देशाचे पंतप्रधान असतात, असे पुणे महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी म्हटले.