नवी दिल्ली : पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. ती नाराजी राष्ट्रवादीने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातल्याची माहिती आहे. 

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कुणाच्या हाती जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चादेखील सुरू होती. अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यावर भाष्य केलं होतं. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पियुष गोयल यांनी प्रफुल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं सांगितलं होतं. 

एकीकडे सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे हाती द्या अशी मागणी होत होती. त्याचवेळी पियुष गोयल यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. स्वतः प्रफुल पटेल यांनी यावर नाराजी व्यक्त करत तसा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती दिली होती. या मुद्द्यावरून भाजपचा राष्ट्रवादीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये हस्तक्षेप होतोय का अशी शंकाही उपस्थित केली जात होती. 

दरम्यान, पियुष गोयल यांनी या आधीच त्यांच्या वक्तव्यावरुन माफी मागितली आहे. दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराने आपल्याला चुकीची माहिती दिल्याने आपल्याकडून हे वक्तव्य झालं असं ते म्हणाले. 

प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांची भेट

दरम्यान, प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली. या दोन्ही नेत्यांशी प्रफुल पटेल यांनी सहा ते सात मिनिटे चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही. 

ज्यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, ते आमच्या पक्षाबद्दल बोलतात, अशी टीका राष्ट्रवादीबाबत बोलणाऱ्यांवर प्रफुल पटेल यांनी केली आहे. विधिमंडळाचा नेता कुणाला निवडावा हा आमच्या पक्षाचा प्रश्न असल्याचंही पटेल म्हणाले. तसेच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

अजितदादानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कुणाकडे जाणार याबाबत प्रक्रिया पार पडत असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय योग्य वेळी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच आमच्यासमोर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

ही बातमी वाचा: