Ambadas Danve on Atul Save: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एका मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडीओमधील मारहाण करणारा व्यक्ती हा मंत्री अतुल सावे (Atul Save) यांचा जवळचा असल्याचा दावा दानवे यांनी केला असून, संबंधित व्यक्ती माजी नगरसेवक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “क्रूरता समोर आल्यावर कुणी मंत्रीपद गमावतो, कुणी तुरुंगात जातो. मात्र मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही," असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Ambadas Danve: दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे?
“पार्टी विथ डिफरन्सच्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ?” असा सवाल करत दानवे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. “दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाज कायमचाच दबून गेला आहे का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पीडिताच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली.
Ambadas Danve: पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी
पुढे बोलताना दानवे म्हणाले, “ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कोणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे. बरोबर ना देवाभाऊ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Ambadas Danve on Atul Save: तो माजी नगरसेवक अतुल सावेंचा निकटवर्तीय
दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, हा माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा आहे. संभाजीनगरचे मंत्री अतुल सावे यांचा तो निकटवर्तीय आहे. इतका मोठा दगड तो एका व्यक्तीच्या डोक्यात घालत आहे. या भागाच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावर साधा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. ही मस्ती कशामुळे येते तर सत्तेमुळे येते. अतुल सावे त्यांना वाचवतात. त्या भागात जनतेने अनाधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्या आहेत. तो व्यक्ती फालतू धंदे करतो. त्याला अतुल सावे यांनी वाचवले. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. हा व्हिडिओ महिना, दोन महिन्यापूर्वीचा आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल का केलेला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता मंत्री अतुल सावे अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
