शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत 15 विरुद्ध 5 अशा बहुमताने पारित करण्यात आलाय.

अकोला : जिल्ह्यातील हिवरखेड (Akola) नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड घडली असून आधीच विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीतवरुन महायुतीत तणाव असताना पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला झटका दिलाय. येथील नगरपालिकेत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या चार नगरसेवकांना (Nagarsevak) अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत 15 विरुद्ध 5 अशा बहुमताने पारित करण्यात आलाय. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांच्या संमतीने हा ठराव मंजूर झाल्याने भाजपा आणि शिवसेनेतील तणाव वाढणार असल्याचं दिसून येते. विशेष म्हणजे, नुकतेच सातारा जिल्हा बँकेतील निवडणूक निकालानंतर भाजपा-शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये वाद दिसून आला होता.
हिवरखेड नगरपरिषेदत शिवसेनेचे एकूण 5 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी, रवी घुंगड, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे आणि श्यामशील भोपळे या चार नगरसेवकांविरोधात भाजपच्या 12 नगरसेवकांनी अपात्रतेचा प्रस्ताव दिला होता. आज झालेल्या विशेष सभेत हात वर करून मतदान घेण्यात आलं आणि ठरावाच्या बाजूने 15, तर विरोधात 5 मतं पडलीत. त्यामुळे शिंदे सेनेच्या चार नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.
हिवरखेड नगरपरिषदेतलं राजकीय वातावरण तापवणारी आजची विशेष सभा लक्षवेधी ठरली. नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली. नगरपरिषदेच्या सभागृहात विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढणे, नगरपरिषदेची बदनामी करणे, मालमत्ता आणि पाणीकर न भरण्याचं सोशल मीडियावर आवाहन करणे, असे गंभीर आरोप शिवसेना नगरसेवकांवर करण्यात आले. त्यातून चार नगरसेवकांवर अपात्रतेचा प्रस्ताव देण्यात आला. त्याच आरोपांच्या आधारे भाजपच्या 12 नगरसेवकांनी 8 सप्टेंबर रोजी नगराध्यक्षांकडे लेखी अर्ज देत विशेष सभा बोलावण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यातील कलम 42 (1) आणि 42 (3) अंतर्गत Misconduct आणि Disgraceful Conduct च्या मुद्द्यावरून अपात्रतेचा ठराव मांडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, भाजप नगरसेवकांनी मांडलेल्या या प्रस्तावाला इतर नगरसेवकांनीही मतदान देत बहुमताने हा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे, राज्यात महायुती म्हणून एकत्र असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर भाजपमुळेच अपात्रतेची टांगती तलवार आली आहे.
भाजपच्या मदतीसाठी काँग्रेस नगरसेवक
दरम्यान, नगर परिषदेत वेगवेगळ्या पदासाठी निवडणुका पार पडल्या, तेव्हा हिवरखेड नगर परिषदेत यापूर्वीही भाजप उमेदवाराच्या मदतीसाठी काँग्रेस आणि एमआयएमचा नगरसेवक धावल्याचं दिसून आलं. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक मिळाल्याचं दिसून आलं. बाल कल्याण समितीच्या उपसभापतीपदासाठी भाजपकडून महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे यांनी अर्ज भरला. त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान होत्या. तर एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचं नाव अनुमोदक म्हणून होतं, याचीही चांगली चर्चा झाली होती.
हिवरखेड नगरपालिका पालिका पक्षीय बलाबल :
नगराध्यक्ष विजयी उमेदवार : सुलभा दुतोंडे (भाजप)
एकूण जागा : 20
भाजप : 11
शिंदेसेना : 05
काँग्रेस : 02
वंचित : 01
एम़आयएम : 01
हेही वाचा























