Akashwani MLA Canteen : चार दिवसांपासून बंद असलेले आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन (Akashwani MLA Canteen) आज मंगळवार (दि. 15)  सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे कॅन्टीन चालवणाऱ्या अजंता केटरर्सला विधिमंडळाकडून परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही परवानगी इतक्या तातडीने कशी मिळाली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं अशी तक्रार करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून निरीक्षण करण्यात आलं होतं. एफडीएच्या तपासणीत कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आल्यामुळे अजंता केटरर्सचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं. यामुळे कॅन्टीनची सेवा तत्काळ बंद करण्यात आली होती.

पुन्हा परवानगी, पण कशी?

मात्र, अजंता केटरर्सने पुन्हा एकदा आज सकाळपासून कॅन्टीन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात ABP माझाने कॅन्टीनचे कर्मचारी आणि व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता आम्हाला परवानगी मिळाली असून कॅन्टीन आज सकाळपासून पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, एवढ्या कमी वेळातच परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित होत आहे.   

अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “कॅन्टीनची अवस्था पाहिली तर त्याला परत परवानगी दिली गेलीच कशी, हा मोठा प्रश्न आहे. ही सेवा जर मराठी माणसाला किंवा बचत गटाला दिली असती, तरी चाललं असतं," असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय घडलं होतं? 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवण मागवलं होतं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असं विचारल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि मारहाण केली होती. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आणखी वाचा 

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्याने धाकधूक वाढली, पण उद्धव ठाकरेंनी प्लॅन सांगितला, शिवसेना-मनसे युतीचं गाडं कधी पुढे सरकणार?