Ajit Pawar Dashkriya Vidhi: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. येत्या 6 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी घरगुतीत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर लगेच 30 तारखेला अजित पवार (Ajit Pawar) यांचा अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचदिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यानंतर अजित पवार यांच्या दशक्रिया विधीची चर्चा होती. मात्र, तिसऱ्या दिवशीच सर्व विधी पार पडले असून पुढील विधी घरच्याघरीच पूर्ण होतील, असेही समजते.
कुटुंबीयांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता 10 व्या किंवा 13 व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही. या सगळ्यावर अजित पवारांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, पुरोगामित्व जपत तीन दिवसांतच सर्व विधी उरकल्याचे समजते.
दरम्यान, आज बारामतीच्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 जानेवारीला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतल्या होत्या. सुनेत्रा पवार या मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडी येथील सहयोग या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासून काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांची व लोकांची रीघ लागली आहे.
Parth Pawar: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची दोन वर्षांची टर्म बाकी आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 ला संपणार होती. मात्र, ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेची सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाईल. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
