Ajit Pawar on Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत अजित पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच....
Ajit Pawar on Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Morcha : हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत.

Ajit Pawar on Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Morcha : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला सध्या राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा मोठा वाद उफाळून आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ५ जुलैला मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले जात आहे. आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. तर चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो, असेदेखील अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुती सरकार ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वीच हिंदीसंबंधी काही निर्णय घेणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो
अजित पवार पुढे म्हणाले की, मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट असते, तिथे त्यावर आम्ही चर्चा करू. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी असं वाटत असतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला, वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येतं. मराठी शिकलं की हिंदी पण येतं, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनसेच्या बॅनरवर झळकला अजित पवारांचा फोटो
दरम्यान, नुकताच मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरमधून मनसेने अजित पवारांना राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हा बॅनर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी लावला होता. संबंधित बॅनरवर अजित पवारांनी हिंदी सक्तीबाबत दिलेल्या प्रतिक्रिया देखील छापण्यात आली होती. इयत्ता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं. इतर कोणत्याही भाषा शिकू नये. कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही, असे त्यांनी म्हटले होते, असा प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांना दिली होती. अजित पवारांच्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत मनसेने महायुती सरकारवर निशाणा साधला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















