रत्नागिरी : राज्यात एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमधील दुरावा काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीही वाढताना दिसून येत आहेत. याच आठवड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार (Sharad pawar) एकत्र आले होते. त्यानंतर, पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप (BJP) सोडून कुठल्याही पक्षासोबत आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची भेट घेतली.
अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या भेटीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील शरद कृषी भवनच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची सूचना शरद पवारांनी निकम यांना केली. तसेच, लवकरच शरद पवार येथील कृषी केंद्राला भेट देणार असल्याचेही समजते. एआय तंत्रज्ञान आधारीत शेतीसाठीच्या सुविधांसाठी कशाप्रकारे काम करता येईल याची माहिती आमदार निकम यांनी शरद पवारांकडून घेतली.
कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात AI (Artificial Intelligence) सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यासाठी आमदार निकम यांनी शरद पवार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने शेखर निकम यांनी पवारांची भेट घेऊन या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत केले. या बैठकीत कृषी उत्पादनवाढ, जलसंपत्ती व्यवस्थापन, हवामानानुसार स्मार्ट शेती, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, यावर विधायक चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, हीच या प्रयत्नामागची मुख्य भूमिका असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
राष्ट्रवादी आघाडीसोबत अनुकूल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अनुकूल आहे. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही आघाडीसाठी राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आजच्या भेटीकडेही केवळ औपचारिकता किंवा शेतीविषय भेट म्हणता येणार नाही.