Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले होते. पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता अमोल मिटकरी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले होते की, आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा बोलून दाखवली आहे.
आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं : माणिकराव कोकाटे
माणिकराव कोकाटे म्हणाले की, “इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं आहे?”, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर कुणाचाही दावा नाही
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमधून पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव या पदासाठी चर्चेत आहे. त्यातच अलीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे देखील नाव नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आले आहे. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, नाशिकच्या बाबतीत फार विवाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा