मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना या दु:खद घटनेनं वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलं आहे. तसेच, आता अजित दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने चर्चा घडत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते गेल्या काही महिन्यांतील चर्चेच्या आठवणी, प्रसंग सांगत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपण अजित पवारांसोबत बैठकी केल्याची माहिती दिली होती. आता, पुण्यातील नेते अंकुश काकडे (ankush kakde) यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणावर मोठं भाष्य केलं आहे. 12 डिसेंबरला दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचं गिफ्ट साहेबांना देण्याचं अजित पवारांच्या मनात होतं, असे अंकुश काकडे यांनी सांगितलं. 

राजकारणातील माझी आणि अजित दादांची सुरुवात एकच वेळेला झाली, दोघेही जिल्हा बँकेत एकत्रित निवडून आलो. मग राजकारणात अनेक वर्ष काम केलं. दादा हे आमचे नेते नेहमी राहिले, पवार साहेबांचा राजकीय वारसा घेऊन दादांनी केलेलं काम महाराष्ट्र विसरू शकणार नाही. पण, मला राहून राहून दुख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, असा आग्रह त्यांनी मला केला होता, असे म्हणत अंकुश काकडे यांनी अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. 

अजित दादा मला म्हणाले, विठ्ठल शेठ, मणियार, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, साहेबांशी बोला. दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील यासाठी प्रयत्न करा. आम्ही जे प्रयत्न करता येणं शक्य होतं ते करत होतो, पण दुर्दैवाने यश आलं नाही, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र लढण्याचा निर्णय झाला आणि तो वरिष्ठ पातळीवर झाल्याने पुण्यातही झाला. मात्र,ऐनवेळी आमचे अध्यक्ष सोडून गेल्याने आमची थोडी पंचायत झाली. अजित दादांशी चर्चा करताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या होत्या. खरं तर 12 डिसेंबरला एकत्र येणार होतो, पण येऊ शकलो नाही, ठीक आहे, निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असेही दादांनी म्हटल्याचं काकडे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस, म्हणजेच वाढदिनी शरद पवारांना मोठं गिफ्ट देण्याची योजना अजित पवारांची होती, हेच यावरुन दिसून येते. 

शशिकांत शिंदेंनीही स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आता सत्य बोलणं गरजेचं आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असं अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल,” असं सूचक वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनीही यापूर्वी एका जाहीर सभेत, “आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागतं?” असे म्हणत एकत्र येण्याच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता.

हेही वाचा

अमित शाह येताच शरद पवार खुर्चीवरुन उठले; गृहमंत्र्यांच्या कृतीने सर्वांच लक्ष वेधले, हात हाती घेत नतमस्तक