Ajit Pawar Funeral: राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी ( 28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवाला बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात मुखाग्नी देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. दादांच्या अकाली जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे 'लाडके दादा' अनंतात विलीन झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. 'एकच दादा अजित दादा' अशी अखेरची घोषणाबाजी चाहत्यांनी केली. कदाचित पुन्हा ही घोषणा ऐकूच येणार नाही. आपले लाडके दादा हरपल्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. अजित पवारांच्या अनपेक्षित निधनाने बारामतीकर पोरके झाले आहेत. आमचा नेता गेला आता का राहायचं राजकारणात? अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
अजित पवारांचा राजकीय वारसा यापुढे कोण चालवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. काही कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी दादांचा वारसा सुनेत्रा पवार पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केलाय. तर काही जणांनी रोहित पवारांचं नाव घेतलं आहे. बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना साथ देणार असल्याचं म्हटलं. दादांचं स्वप्न होतं, ते सुनेत्रा ताई पुढे नेतील. सुनेत्रा ताईंना आम्ही ताकद देऊ असं काहींनी म्हटलं.
नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
अजितदादांची काम करण्याची इच्छाशक्ती आम्ही विरोधी पक्षात असतानाही पाहिली. काही प्रश्न सुटतात, काही सुटत नाहीत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं, त्यात कोरोना मध्ये केलेलं काम असो, डीपीसीमध्ये, शाश्वत विकास मध्ये केलेलं काम पाहता त्यांना एक व्हिजन होतं. नेहमी वेळेवर येणारे दादा निधनाच्या बाबतीत मात्र वेळेच्या आधी गेले. आता मुख्यमंत्री होणार की उपमुख्यमंत्री होणार की एखादा आमदार मंत्री होणार हे सगळे निर्णय परिस्थितीनुसार पक्षश्रेष्ठ ठरवत असतात. अजित पवार पक्षश्रेष्ठ होते. सगळीच स्वप्न पूर्ण झाली नाहीत. पण माणूस कीर्ती रूपाने उरत असतो. माणूस मुख्यमंत्री होता की उपमुख्यमंत्री होता यापेक्षा तू कीर्ती रूपाने पूर्ण महत्त्वाचा आहे. अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
दादांच्या आठवणीत कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजितदादा या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे.
' सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.
नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया
अजित दादांचा पुढचा वारसा कोणी चालवणार याचे उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले,'दादांचा राजकीय वारसा कोण सांभाळणार यावर ते म्हणाले"आता सगळ्यांची मागणी जी होते त्यानुसार सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं. अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे वरिष्ठांची बातचीत करून ठरवू असं झिरवळ म्हणाले.
