सोलापूर : तुम्हाला निधी कुठून मिळणार असे विचारणाऱ्याने आता लक्षात ठेवावे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजितदादांकडेच आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भाजप (BJP) आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार केला. पंढरपूर आणि माढ्यामध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवीत असून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील (Abhijit patil) यांच्या हस्ते मेंढापूर येथील महादेव मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केलं. अभिजीत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांच्यावर टोलेबाजी करीत पालकमंत्री जरा सावध राहावा, असा इशाराही दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे प्रत्येक सभेत यांना निवडून दिले तर निधी कसा आणणार आहेत? असा सवाल करीत असतात. त्यावर, आमदार अभिजीत पाटील यांनी उत्तर देताना दोन्ही राष्ट्रवादी एक असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे आहेत हे लक्षात ठेवा असे म्हटले. एकंदर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने विरोधात असणाऱ्या शरद पवार गटाला आता सत्तेची ताकद मिळाल्याने थेट भाजपलाच आव्हान देण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले कल्याणराव काळे यांच्यावर सडकून टीका करताना दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यावर यांनी आनंदाने एकत्र राहणे गरजेचे होते. मात्र, सत्ता आपल्या कुटुंबात राहावी यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी सुटलो कारण काळे जिथे जातात तिथे पडतात आणि आता ते जिथे गेलेत त्यांना पाडणार हे नक्की असे म्हणत पालकमंत्री जरा सावध राहा, असा टोला अभिजीत पाटील यांनी लगावला. यावेळी, अभिजीत पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्यावर रंडूका अशा शब्दात मिश्किल शेरेबाजी केली.
भाजपचा सुपडा साफ होईल
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ होईल, असे खासदार धैर्यशील पाटील यांनी म्हटले. दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. मागील तीन निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीत स्वाभिमानी जनता भाजपचा सुपडा साफ पॅटर्न चालवणार असल्याचे त्यांनी म्हटले. सोलापूरची जनता स्वाभिमानी आणि पुरोगामी विचारांची आहे, जिल्ह्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका जसा सुपडा साफ पॅटर्न भाजपचा झाला, तोच सुपडाचा पॅटर्न येणारा जिल्हा परिषद निवडणुकीतही होईल, अशी टोलेबाजी मोहिते पाटील यांनी केली.
हेही वाचा
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
