Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) आणि पवार कुटुंबाचं स्थान नेहमीच केंद्रस्थानी राहिलं आहे. मात्र, याच कुटुंबातील शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या निर्णयामुळे केवळ पवार कुटुंबातच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चिंतन शिबिरात आपल्या निर्णयामागचं कारण उघडपणे मांडलं होतं. शिबिराच्या उद्घाटन सत्रात बोलताना त्यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली होती.
Ajit Pawar: ‘हा निर्णय सत्ता किंवा पदासाठी नाही’
अजित पवार म्हणाले होते की, “भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आम्ही सहयोगी आहोत. भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमधील वेदना का स्वीकारल्या, असे अनेक प्रश्न मला विचारले जातात. मी मनापासून सांगतो की, हे पाऊल सत्ता किंवा पदासाठी उचललेले नाही,” असे त्यांनी म्हटले होते. पुढे ते म्हणाले होते की, “महाराष्ट्राला स्थिर सरकार, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे. हीच अंतःकरणातील हाक ऐकून आम्ही हा मार्ग स्वीकारला,” असे देखील अजित पवार यांनी सांगितले होते.
Ajit Pawar: सामाजिक भूमिकेवरही मांडले होते स्पष्ट मत
याच चिंतन शिबिरात अजित पवार यांनी आपली सामाजिक भूमिका देखील ठामपणे मांडली होती. शिबिराच्या एक दिवस आधी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजासाठी ‘आशेचा किरण’ असल्याचं वक्तव्य केल्यानंतर या विषयावरही चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले होते, “मित्रांनो, मी माझी सामाजिक ओळख स्पष्ट करू इच्छितो. मी मराठा समाजात जन्मलेला कार्यकर्ता आहे. मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा, ओबीसी, मागासवर्गीय, धनगर, तेली, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, नवबौद्ध, अशा प्रत्येक समाजघटकाच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी माझी आहे. हे भान ठेवूनच मी राजकारण करतो,” असे त्यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
