Ajit Pawar Baramati Plane Crash News: बारामतीत (Baramati Plane Crash) झालेल्या विमान अपघातानं अख्खा देश हळहळला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातानं महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचंही निधन झालं. भीषण अपघातात आपल्या लाडक्या दादांचं निधन झालं या वृत्तानं अवघा महाराष्ट्र हळहळला. बारामतीतील (Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांचा दुर्दैवी विमान अपघात अख्ख्या देशाला काही महिने मागे घेऊन गेला. बारामतीतल्या भीषण अपघातानं सर्वांना अहमदाबादच्या विमान अपघाताची आठवण करुन दिली. त्यासोबतच लक्ष वेधलं ते दोन्ही अपघातातल्या 11 नंबरनं. अहमदाबादमधल्या अपघातात 11 नंबरनं जीवनदान दिलं, पण अजितदादांच्या विमान अपघातात मात्र, तोच 11 नंबर दुर्दैवी ठरला आणि काळानं घाला घातला. 

गेल्या सात महिन्यांत देशात दोन मोठे विमान अपघात झाले. 12 जून 2025 रोजी अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. पण, चमत्कार म्हणा किंवा देवाची करण म्हणा, या भीषण अपघातातून फक्त एक प्रवासी सुखरुप बचावला. आजवरच्या विमान प्रवासात सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सीट क्रमांक 11A वरुन हा प्रवासी प्रवास करत होता. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी झेपावलेल्या विमानाचा अवघ्या काही सेकंदात अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळलं आणि लाखो लिटर इंधन भरल्यानं आगीच्या भक्ष्यस्थानी आलंले.

अजितदादांचं विमान खडकाळ भूभागावर उंच बांधलेला टेबलटॉप रनवेवर उतरणार होतं... 

अजित पवारांना घेऊन जाणारं विमान बुधवारी महाराष्ट्रातील बारामती जिल्ह्यातही कोसळलं आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. विमान बारामती इथल्या धावपट्टी 11 वर उतरणार होते, ही उंचावरील हवाई पट्टी होती, ज्यामुळे तिथे उतरणं अत्यंत धोकादायक होतं. हा खडकाळ भूभागावर उंच बांधलेला टेबलटॉप रनवे होता.

बारामतीत झालेल्या अजितदादांच्या विमान अपघाताबाबत बोलायचं झालं तर, विमानानं सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उड्डाण केलं आणि पुणे एटीसी आणि नंतर बारामतीच्या संपर्कात होतं. तुम्हाला धावपट्टी दिसते का? यावर चर्चा झाल्यानंतर दादांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना एटीसीनं गोअराउंड म्हणजेच, एक चक्कर मारण्याचा निरोप दिला. सरक्षितरित्या लँडिंग होण्यासाठी एटीसीनं पायलटला गोअराउंड सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा पायलटनं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी मात्र नियतीनं संधी साधली. अजित पवारांचं विमान रनवेच्या अगदी बाजूला काही मीटर अंतरावर क्रॅश झालं. दुर्दैवानं या भीषण अपघातात हरहुन्नरी राजकारणी असलेल्या अजित पवारांना नियतीनं कायमचं हिरावलं. 

खरंतर दुसऱ्या प्रयत्नात पायलटला सकाळी 8:45 वाजता विमान लँड करणार होते. ठरल्याप्रमाणे विमान धावपट्टीनजीक पोहोचलंही. पण, रनवे नंबर  11 वर लँडिंगच्या काही वेळ आधीच बाजूला असलेल्या भागात विमान कोसळलं. लँडिंगच्या आधी शेवटच्या तीन मिनिटांत असं काय झालं की, विमान जाऊन टेबलटॉप रनवेपासून 50 मीटर अंतरावर असलेल्या खड्ड्यात कोसळलं? अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान उतरताना मोठा स्फोट झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. आणि कॅमेऱ्यात मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट देखील कैद झाले आहेत.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा हादरवणारा CCTV

VSR वेंचर्स लिमिटेड लियर जेट 45 विमानाचं अगदी लँडिंगच्या काही तास आधी नियंत्रण बिघडलं आणि विमानाचा भीषण अपघात झाला. विमानाचे तीन तुकडे झाले. बारामती येथील विमान अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, "आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. काही मिनिटांतच संपूर्ण विमानाची राख झाली..."