Devendra Fadnavis and Ajit Pawar: अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला!
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026: खरंतर यावर्षी दादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेड़े विक्रमाची बरोबरी केली असती.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित पवार यांचे अस्तित्व कायम ठळकपणे जाणवायचे. प्रत्येक काम शिस्तीने झालं पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. 'कार्यमग्नता ख्याती व्हावी, मृत्यू हीच विश्रांती' हे वचन अजितदादांना (Ajit Pawar) लागू पडतं. अजितदादा आणि माझा जन्म एकाच दिवशी म्हणजे 22 जुलैचा होता. दादा माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठे होते. पण 2014 नंतर त्यांचं आणि माझं भावनिक नातं तयार झालं होतं. मी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणायचो. पण मला मनात कुठेतरी माहिती होतं, अजित पवार यांच्याशी आपलं अंत:करणापासून नातं आहे, त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे, हे मला माहिती होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Maharashtra Adhiveshan 2026)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी झालेल्या शेवटच्या भेटीचा उल्लेख केला. 27 जानेवारी 2026 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पायाभूत सुविधांसंदर्भात एक बैठक झाली. त्या बैठकीतही अजितदादांनी त्यांच्या सिग्नेचर शैलीत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. मी सकाळीच माहिती घेतली, इतर राज्यात भांडवली खर्चात ग्रॉस व्हॅल्यू अॅडिशन जास्त होते. आपल्याकडे ते प्रमाण तेवढे नाही, असे का, असा सवाल अजितदादांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर अजितदादा आणि मी सार्वजनिक बांधकाम विभागात एका प्रेझेंटेशनला उपस्थित होतो. ही बैठक संपल्यावर अजितदादा आणि मी मंत्रालयातील माझ्या अँटी चेंबरमध्ये गेलो. त्यावेळी आम्ही जवळपास 30 ते 40 मिनिटं वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. त्यानंतर दादा तिथून निघून गेले. तेव्हा पुसटशी कल्पनाही नव्हती की, ही आपली शेवटची भेट ठरेल. दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या अपघाताची बातमी आली तेव्हा वाटलं, की अपघात झाला पण अजितदादांना काही झालं नसेल. पण नंतर विमानाची परिस्थिती पाहिली तेव्हा कोणीही जिवंत नसेल, हे लक्षात आलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवार हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं तर अनेकांचा आत्मविश्वास होता. अजित पवार हे मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. त्यांनी कधीही कोणत्याही संघर्षाला पाठ दाखवली नाही. समाजाला एखादी गोष्ट चूक वाटतेय, असं लक्षात आलं तर ते जाहीर माफी मागायचे. अजितदादा हा शब्दाला जागणारा नेता होता. मी 2019 साली याचा अनुभव घेतला. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता, त्यांच्या वरिष्ठांनी शब्द बदलला पण अजितदादांनी शब्द पाळला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
























